बाबाजानींची जादू चालली; परभणीत अध्यक्ष-उपाध्यक्षपदेही मिळाली

जिल्हा परिषदेतील महा-महा विकास आघाडीचे शिल्पकार आमदार बाबाजानी दुर्राणी हे ठरले आहेत.नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना एकाच मांडवाखाली आणणे काही सोपे नव्हते. परंतु, बाबाजानी यांनी ते करुन दाखवले आहे
NCP Mla Babajani Durrani With Parbhani Zilla Parishad Office Bearers
NCP Mla Babajani Durrani With Parbhani Zilla Parishad Office Bearers

परभणी : परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा करिष्मा काम करून गेला. अध्यक्ष पदावर हक्क तर होताच, परंतु, शिवसेनेतील बेबनावामुळे उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवण्यात आमदार बाबाजानींना यश आले. शिवसेनेतील बेबनाव व राष्ट्रवादी काँग्रेसची कुटनिती यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधकच उरला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासाठी 28 सदस्यांची गरज होती. परंतु, यावेळी बिनविरोध निवडीचा पॅटर्न यशस्वी झाला. मागील कार्यकाळात राष्ट्रवादीने भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. यावेळेस महाविकास आघाडीची चर्चा सुरु झाली. सुरुवातीला अध्यक्षपदाचा वाद समोर आला. परंतु, आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सुरुवातीपासून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या मातु:श्री निर्मलाबाई विटेकर यांचे नाव रेटून धरले. 

जिंतुर मतदार संघात माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाचे 13 सदस्य असल्याने विजय भांबळे अध्यक्षपद सोडायला तयार नव्हते. अखेर आमदार दुर्राणी यांनी रविवारी सर्वपक्षीय सदस्यांसह लोकप्रतिनिधींची बैठक घेत विटेकर यांच्या नावावर एकमत घडवुन आणले. त्यानंतर दोन दिवसांपासून उपाध्यक्षपदाची चर्चा सुरु झाली. त्यातच शिवसेनेने या पदावर दावा केला. मात्र, शिवसेनेत या पदासाठी एकमत झाले नाही. याचा फायदा उचलत विजय भांबळे यांनी उपाध्यक्षपदासाठी जोर लावला. 

मंगळवारी सकाळी शिवसेना आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या निवासस्थानी या नेत्यांची बैठक झाली. परंतु, शिवसेनेतील अतंर्गत बेबनावामुळे त्यांचे पदासाठी एकमत होऊ शकले नाही. अखेर भाबंळे यांनी बाजी मारत उपाध्यक्षपद खेचले. अर्ज भरण्याच्या अखेरच्या काही मिनीटात अध्यक्षपदासाठी निर्मलाबाई विटेकर आणि उपाध्यक्षपदासाठी अजय चौधरी यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत दोघांचेच अर्ज आल्याने दुपारी तीन वाजता त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.  

जिल्हा परिषदेतील महा-महा विकास आघाडीचे शिल्पकार आमदार बाबाजानी दुर्राणी हे ठरले आहेत.नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना एकाच मांडवाखाली आणणे काही सोपे नव्हते. परंतु, बाबाजानी यांनी ते करुन दाखवले आहे.सुरुवातीला राष्ट्रवादीसोबत शिवसेना, कॉंग्रेस हे पक्ष येणार अशी चर्चा होती. मात्र बाबाजानी यांनी अशी काही जादू केली की,जिल्हा परिषदेतील सर्वच पक्ष त्यांच्या नेतृवाखाली आले.

असे आहे पक्षीय बलाबल

परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 24, शिवसेना-13, कॉंग्रेस-6, भाजपा 5, रासप -3, घनदाट मित्रमंडळ-1, अपक्ष-2 असे संख्याबळ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com