parbhani muncipal corporation | Sarkarnama

परभणी महापालिकेत बड्या पुढाऱ्यांच्या वर्चस्वाची लढाई

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 मार्च 2017

परभणी ः आगामी महापालिका निवडणूक बहुतांश नेतेमंडळींसाठी अस्मितेची, अस्तित्वाची व वर्चस्ववादाची ठरणार असून लोकप्रतिनिधींसह विविध पक्षाचे पुढारी साम, दाम, दंड नीतीसह नात्यागोत्याच्या राजकारणाचा पुरेपूर वापर करणार असल्याचे चित्र आहे. 

परभणी ः आगामी महापालिका निवडणूक बहुतांश नेतेमंडळींसाठी अस्मितेची, अस्तित्वाची व वर्चस्ववादाची ठरणार असून लोकप्रतिनिधींसह विविध पक्षाचे पुढारी साम, दाम, दंड नीतीसह नात्यागोत्याच्या राजकारणाचा पुरेपूर वापर करणार असल्याचे चित्र आहे. 
परभणी महापालिकेची ही दुसरी निवडणूक असून या निवडणुकीतून अनेकांच्या राजकारणाची दिशा निश्‍चित होणार आहे. राज्यभरात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली असून शिवसेनाही वाढू लागली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक गड ढासळू लागले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून किमान आपली अस्मिता वाचविण्यासाठी काही जण मतभेदासह तर काहीजण मतभेद विसरून कामाला लागले आहेत. जे पुढारी या निवडणुकीतून अलिप्त राहतील त्यांच्यावर राजकारण संन्यास घेण्याची वेळ येणार आहे. तर जे नेते वर्चस्व मिळवतील ते जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा निश्‍चित करणार आहेत. 
नात्यागोत्यांच्या राजकारणावरच भर 
महापालिकेच्या या निवडणुकीत नात्यागोत्यांचे राजकारणच प्रभावी ठरणार असल्याचे दिसून येते. बड्या पुढाऱ्यांच्या घरातील मंडळी याही निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उतरण्याची शक्‍यता असून त्यामुळे अनेक निष्ठावतांच्या संधी दवडल्या जाणार हे निश्‍चित. त्यामुळे मतदार राजा त्यांना स्वीकारणार का? हे आगामी काळात दिसून येणार आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत संघर्ष देखील मोठा असून जितका अधिक संघर्ष तितका अधिक फटका त्या पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे. नेत्यांच्या वादाचे कार्यकर्ते बळी ठरणार हे निश्‍चित. 
सुरेश देशमुख, सुरेश वरपुडकरांच्या अस्तित्वाची लढाई 
जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्‍य म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री व कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर व नगरपालिकेवर अनेक वर्ष सत्ता गाजवणारे सुरेश देशमुख यांच्या अस्तित्वाची ही निवडणूक ठरणार आहे. श्री. देशमुख या निवडणुकीसाठी गढीवरून खाली उतरले नसून सध्यातरी सर्व सूत्रे वरपुडकरांच्याच हातात असल्याचे दिसून येते. श्री. वरपुडकर कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर पक्षाने बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण केलेले असून ते कॅश करण्यासाठी या मंडळींना आपले अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे. 
बाबाजानी दुर्राणी, प्रताप देशमुखांची प्रतिष्ठा पणाला 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी व पहिले महापौर प्रताप देशमुख यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिला महापालिकेत सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचे अनेक नगरसेवक कॉंग्रेसवासी झाले असून नवे उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहेत. श्री. दुर्राणी यांनी पुन्हा महापालिकेत राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहणार असल्याचे रणशींग फुंकले आहे. पक्षांच्या आमदारांना सोबतीला घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणावर सत्तेसह पत राखण्याचे आव्हान या दोघांपुढे आहे. 
खासदार, आमदारांच्या वर्चस्वाची निवडणूक 
जिल्ह्याच्या राजकारणावर खासदार संजय जाधव यांनी बऱ्यापैकी मांड बसवली आहे. तर आमदार डॉ. राहुल पाटील शहरावर मांड पक्की करण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणून त्यांच्यासाठी ही निवडणूक वर्चस्वाची ठरणार आहे. लोकसभेसह परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्षानुवर्षापासून वर्चस्व आहे. परंतु तत्कालीन नगरपरिषद व महापालिकेवर पक्षाचे वर्चस्व नाही. पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकावण्यासाठी त्यांना आपसातील संघर्ष थांबवून पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे पाठबळ उभे केले. तरच त्यांचे वर्चस्व सिद्ध होणार आहे. 
ऍड. गव्हाणे, भरोसे यांच्यासाठी "करो वा मरो' 
राज्यात सर्वत्र भाजपचा वारू उधळत असताना जिल्ह्यात मात्र भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. पक्षाचे नेते माजी आमदार विजय गव्हाणे व शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शहरातच राहणारे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्यासाठी ही निवडणूक "करो वा मरो' स्थिती निर्माण करणारी ठरणार आहे. मतदार आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत, नेत्यांचीच संख्या अधिक, अशी पक्षाची स्थिती असून ती बदलण्यासाठी त्यांना सामूहिक प्रयत्नाबरोबरच सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. 
 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख