परभणीत शिवसेनेच्या संजय जाधव यांच्याशी तुल्यबळ लढत कोण देईल याचीच उत्सुकता

मंत्री लोणीकर अचानकच का थांबले याचा उलगडा कोणाला ही होत नाही. दुसरी कडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मेघना बोर्डीकर या मतदार संघात सक्रीय झाल्या आहेत. त्यांनीही गावेच्या गावे पालथी घातली आहेत. शिवसेनेकडून एकमेव विद्यमान खासदार संजय जाधव यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे.
परभणीत शिवसेनेच्या संजय जाधव यांच्याशी तुल्यबळ लढत कोण देईल याचीच उत्सुकता

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने भेटी देणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या भेटींना अचानक 'ब्रेक' दिला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून इच्छुक असलेल्या मेघना बोर्डीकर मतदार संघात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे मंत्री बबनरावांना पक्षाने थांबविले असावे का ? असा प्रश्न इथल्या राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय. गेल्या 20 वर्षापासून हा मतदार संघ ताब्यात असलेल्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इच्छुकांची नावेही अद्याप चर्चेत आलेली नाहीत. 

परभणी लोकसभा मतदार संघात 1957 ते 1977 पर्यत कॉंग्रेसच्या खासदारानेच प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर 1977 मध्ये या मतदार संघात शेकापचे शेषराव देशमुख खासदार म्हणून विजयी झाले. परंतु 1980 पासून कॉंग्रेसच्या खासदारांची परंपरा सुरु झाली सलग दोन वेळा कॉंग्रेसचे खासदार या मतदार संघात विजयी झाले. त्यानंतर ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देऊन मराठवाड्याच्या राजकारणात प्रवेश केलेल्या शिवसेनेला या मतदार संघात यश आले. हे यश सलग तीन कार्यकाळ अबाधित होते. मात्र 12 व्या लोकसभेत या मतदार संघात मतांच्या विभाजनामुळे कॉग्रेस (आय) चा उमेदवार विजयी झाला. परंतू परत 13 व्या लोकसभेपासून ते आजतागायत या मतदार संघात शिवसेनेचे खासदार विजयी होत आलेले आहेत. 

सलग 20 वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस - कॉग्रेस सज्ज आहेत. परंतू शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी म्हणून समोर येणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेस - कॉग्रेसकडे अद्यापही इच्छुक उमेदवारांचीच वानवा आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर भाजपकडून मेघना बोर्डीकर, आनंद भरोसे, सुरेश नागरे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अद्याप कोणाचे नावही चर्चेत आलेले नाही. 

आगामी निवडणुकांमध्ये कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी होणार असल्याचे संकेत दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठीकडून सातत्याने दिले जात आहेत. त्यामुळे आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉग्रेसकडे जाते. परंतू राष्ट्रवादी कॉग्रेसकडे सध्यातरी लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक कोण आहे याची कुठेही चर्चा होतांना दिसत नाही. 
विधान परिषद निवडणुकीत आमदार बाबाजानी दुर्राणी यांना राज्यमंत्री सुरेश वरपुडकर सहकार्य करणार, सुरेश वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदार संघात इच्छुक असल्याने त्यांना आमदार बाबाजानी दुर्राणी सहकार्य करणार तर लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना तिकिट देऊन दुर्राणी व वरपुडकर हे विटेकरांसाठी काम करणार असे सुत्र ठऱले होते. परंतू ऐनवेळी विधान परिषदेची जागा कॉंग्रेसकडे गेल्याने हे सूत्र विस्कटले गेले. 

राजेश विटेकर हे लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत किंवा नाही हे त्यांनी अद्यापही जाहीर केलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसकडे दुसरा उमेदवार कोण ? हा प्रश्न निर्माण होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे इच्छुक होते. त्यासाठीच त्यांनी गेल्या दोन वर्षापासून परभणी लोकसभा मतदार संघात लक्ष केंद्रीत केले होते. सातत्याने जिल्ह्यातील विकास कामाची पाहणी करणे, जनसंपर्क वाढविणे हे काम लोणीकरांनी सुरु केले होते. राज्य शासनाच्या समाधान शिबीराच्या माध्यमातूनही त्यांनी परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंचून काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपच्या या दोन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मंत्री लोणीकरांनी समाधान शिबीराचा समारोप देखील केला होता. त्यामुळे बबनराव परभणी लोकसभा लढविणारच हे निश्‍चित मानले जात होते. परंतू अचानकच परभणी जिल्ह्यातील संपर्क कमी केल्याचे दिसत आहे. 

मंत्री लोणीकर अचानकच का थांबले याचा उलगडा कोणाला ही होत नाही. दुसरी कडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मेघना बोर्डीकर या मतदार संघात सक्रीय झाल्या आहेत. त्यांनीही गावेच्या गावे पालथी घातली आहेत. शिवसेनेकडून एकमेव विद्यमान खासदार संजय जाधव यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विद्यमान खासदारांना परत संधी देण्यात येईल असे विधान केल्याने संजय जाधव हे शिवसेनेकडून निश्‍चित मानले जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com