parbhani corporation | Sarkarnama

परभणी महापालिकेत कॉंग्रेसला सर्वाधिक 31 जागा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष समोर आला असला तरी, त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दोन नगरसेवकांची गरज भासणार आहे. विजयी झालेले दोन अपक्ष हे कॉंग्रेसचेच बंडखोर असल्याने ते कॉंग्रेससोबत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे

परभणी : परभणी महापालिकेत सर्वाधिक 31 जागांवर विजय संपादित करून कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस 18 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप आठ जागांवर विजयी झाली आहे तर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला केवळ सहा जागेवरच समाधान मानावे लागले. दोन जागा अपक्षांच्या पदरात पडल्या आहेत. 

परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. 65 जागेसाठी 418 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणी शुक्रवारी झाली. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सकाळी अकरा वाजता प्रभाग आठचा पहिला निकाल हाती आला. या प्रभागातल्या सर्वच्या सर्व चार जागा कॉंग्रेसनेच जिंकल्या आणि विजयी सुरवात केली. त्यानंतर हळू-हळू एक -एक निकाल हाती येत गेले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्व 65 जागांचे निकाल हाती आले. यात कॉंग्रेस 31 , राष्ट्रवादी कॉंग्रेस 18, भारतीय जनता पक्ष आठ, शिवसेना सहा तर अपक्ष दोन जागेवर विजयी झाले आहेत. 

सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष समोर आला असला तरी, त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दोन नगरसेवकांची गरज भासणार आहे. विजयी झालेले दोन अपक्ष हे कॉंग्रेसचेच बंडखोर असल्याने ते कॉंग्रेससोबत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, निवडणुकीचे निकाल घोषित होताच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी परभणी महापालिकेत कॉंग्रेसचा महापौर होईल हे घोषित केले. 
मात्तबर उमेदवार पराभूत 
प्रभाग 15 मधून निवडणूक लढविणारे राजेंद्र वडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. ते महापौर संगीता वडकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांचे पती आहेत. व प्रभाग नऊ मधून निवडणूक लढविणाऱ्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे (शिवसेना) या देखील पराभूत झाल्या. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. याच प्रभागातून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. 
 कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे यश - वरपुडकर 
परभणीकरांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न यामुळे सत्तेच्या आकड्यापर्यंत आम्ही मजल मारली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे प्रदेश कमिटीचे नेते ठरवतील, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी शुक्रवारी दिली. परभणी महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस 31 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरपुडकर बोलत होते. ते म्हणाले, परभणीतील जनतेने पूर्ण विश्वासाने आम्हाला बहुमत दिले आहे. चांगले उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जनतेचा पाठिंबा व कार्यकर्त्यांचे प्रयत्न यामुळे हा आकडा गाठता आला. पुढील पाच वर्षांतील विकास कामात आम्ही पाणी पुरवठ्याच्या समस्येला प्राधान्य देणार आहोत.

पक्षातील सर्वांनी एक दिलाने काम करून पक्षाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. या सकारात्मक गुणामुळेच आम्ही हे यश गाठू शकलो असे ही ते म्हणाले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष ऍड. तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, लियाकत अली अन्सारी, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, ऍड. मुजाहेद खान, भगवानराव वाघमारे, समशेर वरपुडकर, पंजाबराव देशमुख, बाळासाहेब फुलारी आदींची उपस्थिती होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख