parbhani corporation | Sarkarnama

परभणीत चारही पक्ष स्वतंत्र लढणार 

सरकारनामा न्यूजब्युरो 
बुधवार, 8 मार्च 2017

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना - भारतीय जनता पक्षातील युतीची सुतराम शक्‍यता नाही. परंतु महापालिकेच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस
व कॉंग्रेस पक्षात देखील आघाडीची शक्‍यता नाही. गेल्या निवडणुकीप्रमाणे चारही पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहेत. 

परभणी : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना - भारतीय जनता पक्षातील युतीची सुतराम शक्‍यता नाही. परंतु महापालिकेच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस
व कॉंग्रेस पक्षात देखील आघाडीची शक्‍यता नाही. गेल्या निवडणुकीप्रमाणे चारही पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहेत. 

गत निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती काही प्रभागात होती. अपवाद वगळता सर्वच्या सर्व प्रभागात उमेदवार देणे या पक्षांना शक्‍य झाले नव्हते. त्यावेळी राज्यात
सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा शहरात बोलबोला होता. त्यामुळे राष्ट्रवादी सत्तेच्या जवळ पोचली होती. त्या पाठोपाठ कॉंग्रेस, शिवसेना व भाजप असा क्रम होता. 

आता राजकारण बदलले आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे शासन आले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष महापालिकेवर झेंडा फडकवण्याची अपेक्षा बाळगून
कामाला लागले आहेत. परंतु जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपरिषदांच्या निवडणुकीत साधक-बाधक यशामुळे त्यांच्या आशा आकांक्षांना कुठेतरी ब्रेक लागला
आहे. कॉंग्रेसचे पानिपत झाले आहे तर राष्ट्रवादीने अपेक्षेपेक्षाही चांगले यश मिळविले आहे. त्याचा परिणाम महापालिकेत पहायला मिळणार आहे. 

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच नगरसेवक, माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांचे पक्षांतर सोहळे रंगत आहेत. काही जण गाजावाजा न करता कमिटमेंट घेऊन सोयीची
पक्षांतरे करीत आहेत. परंतु एकदा का तिकीट वाटप सुरू झाले व तिकिटाची अपेक्षा मावळली अशा परिस्थितीत पक्षांतरे करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार
आहे. ज्या पक्षांकडे उमेदवारांची वानवा आहे, त्या पक्षाला त्यामुळे आपसूकच उमेदवार मिळणार आहेत. 

ज्या पक्षात दोन सत्तास्थाने आहेत, त्या पक्षातील संघर्ष तर टिपेला पोचण्याची शक्‍यता आहे. काही पक्षात तर तो सुरूदेखील झाला आहे. श्रेयाच्या लढाईत पक्षातीलच
कार्यकर्त्यांचा त्यामध्ये बळी जाण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर काही घरांत भाऊबंदकीदेखील उफाळण्याची शक्‍यता आहे. एक एका पक्षात दुसरा दुसऱ्या पक्षातून
मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. काही पक्षांनी तर तसे जाळे देखील फेकली असून त्यामध्ये कुठले घर फुटते हे काही दिवसांत समजणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख