परभणीच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे , उपमहापौरपदी भगवान वाघमारे

परभणीच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे , उपमहापौरपदी भगवान वाघमारे

परभणी : परभणी महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या अनिता रविंद्र सोनकांबळे यांची तर उपमहापौरपदी भगवान वाघमारे यांची निवड झाली. भाजपाच्या मंगला मुदगलकर व मोकिंद खिल्लारे यांना मोठ्या मताधिक्‍याने पराभवाला सामोरे जावे लागले. 

बी. रघुनाथ सभागृहात शुक्रवारी (22) पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर-उपमहापौर निवडीची विशेष सभा झाली. यावेळी आयुक्त रमेश पवार, नगर सचिव विकास रत्नपारखे यांची उपस्थिती होती. महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून या पदासाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी निर्धारित वेळेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. वर्षा खिल्लारे व श्रीमती गवळण रोडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. 

या पदासाठी कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे व भाजपाच्या मंगल मुदगलकर यांच्या थेट लढत झाली. भाजपाच्या मुदगलकर यांना आठ मते पडली तर कॉंग्रेसच्या सोनकांबळे यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे चार व राष्ट्रवादीचे 10 असे एकूण 14 सदस्य तटस्थ राहिले. पाच सदस्य अनुपस्थित होते. तर एक सदस्य उपस्थित असुनही बाहेर गेल्यामुळे त्यांची नोंद मतदान प्रक्रियेत झाली नाही. कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे यांची तब्बल 29 मतांनी महापौरपदी निवड घोषीत झाली. त्यांना कॉंग्रेसच्या 28, राष्ट्रवादीच्या सात, अपक्ष एक व एमआयएमच्या एका सदस्याने मतदान केले. 
उपमहापौरपदी भगवान वाघमारे यांची निवड 
उपमहापौरपदाच्या निवडणूकीत पाच पैकी कॉंग्रेसच्या खान महेमुद अब्दुल मजीद व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महेबुब अली पाशा व अलीखान मोईनखान यांनी माघार घेतल्यामुळे कॉंग्रेसचे भगवान वाघमारे व भारतीय जनता पक्षाचे मोकिंद खिल्लारे यांच्यात थेट लढत झाले. श्री. वाघमारे यांना 37 मते तर खिल्लारे यांना आठ मते पडली. श्री. वाघमारे हे 29 च्या मताधिक्‍क्‍याने विजयी घोषित करण्यात आले. तर 15 सदस्य तटस्थ राहिले. त्यामध्ये शिवसेनेचे चार व राष्ट्रवादीच्या 11 सदस्यांचा समावेश आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीची शकले उडाल्याचे चित्र होते. पालिकेत राष्ट्रवादीचे 19 सदस्य असून त्यांना एका अपक्ष सदस्याचे देखील पाठबळ आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या सात सदस्यांच्या गटाने कॉंग्रेस पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे कॉंग्रेसचा मार्ग सुकर झाला. उर्वरीत सदस्यांनी म्हणजे 12 पैकी 11 सदस्यांनी विरोधी पक्ष नेते विजय जामकर यांच्या नेतृत्वाखाली तटस्थ राहण्याची भूमिका बजावली. 

शिवसेनेने चालवला वारसा.... 
महापालिकेच्या आत्तापर्यंत झालेल्या सर्व महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. ती यावेळी देखील कायम होती. पाच पैकी उपस्थित चार सदस्य तटस्थ राहिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com