परभणी महापालिका त्रिशंकू, कॉंग्रेस बहुमताच्याजवळ...

यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. यावेळी सत्ता असल्यामुळे भाजपसह, शिवसेनेने देखील महापालिका निवडणूक आपल्याच ताब्यात घ्यायची, असा चंग बांधला होता.विशेष म्हणजे या निवडणुकीत परभणीकरांना विकासाचा अजेंडा न दाखविताच सर्वांनी निवडणुका लढविल्या.
 परभणी महापालिका त्रिशंकू, कॉंग्रेस बहुमताच्याजवळ...

परभणी : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्ह्यात महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बाजी मारणार का? अशी चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी राष्ट्रवादीला मागे टाकत कॉंग्रेस बहुमताच्या जवळ गेली आहे. राष्ट्रवादीतून कॉंग्रेसमध्ये आलेले सुरेश वरपुडकर यांनी सगळ्यांवर मात करत विजय संपादन केला असला तरी बहुमताचा 33 चा आकडा त्यांना गाठता आला नाही.

राष्ट्रवादीची भूमिका आता निर्णायक राहणार असून सत्तेची चावी त्यांच्याच हातात राहिली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपचा मात्र सफाया झाला आहे. 
परभणी महापालिकेची स्थापना 2012 मध्ये झाली.पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 30, कॉंग्रेसला 23, शिवसेनेला आठ तर भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे गेली पाच वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती.

सुरवातीला अडीच वर्षे राष्ट्रवादीचा महापौर आणि उपमहापौर होता. त्यानंतर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा महापौर पण कॉंग्रेसचा उपमहापौर होता. दरम्यानच्या काळात केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची सत्ता आली. परभणीतही राष्ट्रवादीचे सुरेश वरपुडकर विधानसभेला तिकीट मिळाले नसल्याने कॉंग्रेसमध्ये आले आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. 

परभणी महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख यांनी तर राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, शिवसेनेतर्फे खासदार बंडू जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार विजय गव्हाणे, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली.

यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. यावेळी सत्ता असल्यामुळे भाजपसह, शिवसेनेने देखील महापालिका निवडणूक आपल्याच ताब्यात घ्यायची, असा चंग बांधला होता. 
विशेष म्हणजे या निवडणुकीत परभणीकरांना विकासाचा अजेंडा न दाखविताच सर्वांनी निवडणुका लढविल्या. एका प्रभागात पॅनलनिहाय प्रत्येक पक्षाला चार उमेदवारांची निवड करताना पक्षाच्या नेत्यांची उमेदवारी निश्‍चित करताना चांगलीच दमछाक झाली. तरीही सर्वांनीच जवळपास 60 हून अधिक उमेदवारी देत जोरदार किल्ला लढविला.

विशेष म्हणजे निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून प्रदेशाध्यक्ष दानवे वगळता कोणीही बडा नेता प्रचारासाठी आला नाही तर कॉंग्रेसच्या शहरामध्ये दोन मोठ्या सभा झाल्या. या सभा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी घेतल्या. शिवसेनेचे पालकमंत्री राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक सभा घेतली तर राष्ट्रवादीकडून कोणताही नेता सभेसाठी आला नाही सर्व मदार जिल्हाध्यक्ष आमदार दुर्राणी यांच्यावर होती. अशा स्थितीत झालेल्या निवडणुकीत परभणीकर कुणाला निवडून देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सुरवातीपासूनच कॉंग्रेसने विजयाची मालिका सुरू ठेवली होती मात्र ती शेवटपर्यंत टिकविता आली नाही. शेवटच्या टप्यात राष्ट्रवादीने बाजी मारत 20 चा टप्पा गाठला. त्यामुळे कॉंग्रेसला बहुमतासाठी 33 जागा मिळवत्या आल्या नाहीत. त्यांना 29 जागावर समाधान मानावे लागले.

आता कॉंग्रेसला बहुमतासाठी चार जागांची गरज आहे. त्यात पक्षीय बलाबलमध्ये राष्ट्रवादी 20, भाजप आठ, शिवसेना सहा आणि दोन अपक्षांनी विजय मिळविला आहे. आता बहुमतासाठी चारपैकी दोन अपक्षांनी पाठिंबा दिला तरी कॉंग्रेसकडे दोन जागा कमी पडतात. अशा वेळी शिवसेना किंवा भाजप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास कॉंग्रेसला सत्ता मिळविणे सोपे जाऊ शकते. तसेच अन्य पर्यायामध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस दोघे एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. हा जर - तर चा पर्याय कसा सुटणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आगामी परभणी - हिंगोली विधान परिषदेची निवडणूक लवकरच असून त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महापालिकेचे सत्तेचे राजकारण ठरणार आहे. हे मात्र निश्‍चित. 

पक्षीय बलाबल (कंसातील आकडे 2012 च्या निवडणुकीतले आहेत.) 
एकूण जागा - 65 
कॉंग्रेस - 29 (23) 
राष्ट्रवादी - 20 (30) 
शिवसेना - 6 (8) 
भाजप - 8(2) 
अपक्ष - 2 (2) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com