परभणीत आजी-माजी नगरसेवकामधल्या लढती चुरशीच्या ठरणार

परभणीत आजी-माजी नगरसेवकामधल्या लढती चुरशीच्या ठरणार

परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्‍यतो दोन मातब्बर उमेदवार एकमेकांविरुद्ध लढण्याचे टाळतात. मात्र यावेळी परभणी महापालिकेच्या निवडणुकीत विद्यमान नगरसेवक, आजी-माजी नगरसेवक आमनेसामने असून त्यांच्यातील या लढती चुरशीच्या व रंगतदार ठरणार आहेत. तसेच काही प्रभागांत या आजी-माजींसमोर अन्य पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी देखील मोठे आव्हान उभे केले आहे. 
शहराच्या मध्यवस्तीतील प्रभाग क्रमांक नऊ मधील अ व ब गटातील सर्वात प्रतिष्ठेच्या, चुरशीच्या व अटीतटीच्या ठरणार आहेत. अ गटात शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या अंबिका अनिल डहाळे यांच्यासमोर कॉंग्रेसचे विद्यमान स्वीकृत सदस्य सचिन अंबिलवादे व भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक वसंत मुरकुटे यांचे आव्हान आहे. ब गटात कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान उपमहापौर भगवान वाघमारे, भाजपचे विद्यमान नगरसेवक दिलीप ठाकूर व शिवसेनेचे विद्यमान स्वीकृत सदस्य नवनीत पाचपोर यांच्यात लढत होणार आहे. या सहापैकी अधिकाधिक दोघांना संधी आहे, त्यामुळे या प्रभागातील लढत काट्याची होणार हे निश्‍चित. 
प्रभाग क्रमांग सहा क मधील लढत देखील लक्षवेधक आहे. कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविकेचे चिरंजीव व माजी नगरसेवक शेख खाजा शेख मेहबूब व माजी नगरसेवक व शिवसेनेचे उमेदवार राजेश सोनवणे आमनेसामने आहेत. येथील भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली तर राष्ट्रवादीचे हुसैनी सय्यद इमरान हे उमेदवार आहेत. ड गटात विद्यमान नगरसेविका कॉंग्रेस पक्षाच्या सुरय्या बी शेख मोईन व माजी नगरसेविका शिवसेनेच्या सुभद्राबाई बापूराव वाघमारे या रिंगणात असून तेथे राष्ट्रवादीच्या सय्यद अबेदाबी व भाजपच्या सत्त्वशीला लहाने या उमेदवार आहेत. 
प्रभाग क्रमांक एकमधील क गटात भाजपच्या विद्यमान नगरसेविका तिरुमला खिल्लारे यांचे पती व माजी नगरसेवक मोकिंद खिल्लारे व माजी नगरसेवक व शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग देशमुख एकमेकांसमोर असून तेथे कॉंग्रेसचे दत्तात्रय दैठणकर व राष्ट्रवादीचे किरण प्रधान हे उमेदवार आहेत. ड गटात विद्यमान नगरसेविका व भाजपच्या उमेदवार आशाताई नर्सीकर यांची माजी नगरसेविका शिवसेनेच्या विमल पांडे व माजी नगरसेविका कॉंग्रेसच्या राधिका गोमचाळे यांच्याशी तिरंगी लढत होणार आहे. अ गटात विद्यमान नगरसेवक व्यंकट डहाळे यांच्या आई व माजी नगरसेविका भाजपाच्या यमुनाबाई डहाळे व माजी नगरसेविका अपक्ष उमेदवार प्रभावती राऊत या असून कॉंग्रेसच्या सीमा नागरे, शिवसेनेच्या हर्षल जैस्वाल या रिंगणात आहेत. 
प्रभाग क्रमांक तीन अमध्ये विद्यमान नगरसेविका कॉंग्रेसच्या अनिता रवींद्र सोनकांबळे, माजी नगरसेविका व अपक्ष उमेदवार लक्ष्मी बबन मकासरे असून येथे राष्ट्रवादीच्या रत्नमाला येडे व शिवसेनेच्या वैशाली राजन सारणीकर उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक चार मधील ब गटात कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका विजया लक्ष्मण कनले यांच्यापुढे शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशास ठाकूर यांचे आव्हान असेल. या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रकाश कदम व भाजपचे डॉ. प्रकाश कांबळे हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक पाच मधील ब गटात विद्यमान नगरसेवक सचिन देशमुख यांना कॉंग्रेसने तर विद्यमान नगरसेवक शिवाजी भरोसे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. येथे राष्ट्रवादीने सचिन जवंजाळ यांना तर शिवसेनेने ऍड. दीपक देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. 
प्रभाग क्रमांक दहा मधील ब गटात स्थायी समितीचे विद्यमान सभापती व राष्ट्रवादीचे उमेदवार बालासाहेब बुलबुले व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक संगीता कलमे आमने सामने असून या गटात कॉंग्रेसने वैजनाथ देवकते व भाजपाने संतोष ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. 
प्रभाग क्रमांत 14 ब मध्ये देखील काट्याची लढत होण्याची शक्‍यता आहे. येथे विद्यमान नगरसेवक कॉंग्रेसचे काझी मुखीमोद्दीन व माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे मो. जलालोद्दीन इमामोद्दीन हे उमेदवार आहेत. शिवसेनेने अक्षय पाटील तर भाजपने संजय रिझवानी यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 16 च्या अ गटात शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका शांताबाई प्रल्हाद चव्हाण व विद्यमान नगरसेविका व भाजपाच्या उमेदवार स्वाती सुनील खताळ यांच्यासह कॉंग्रेसच्या शेख रुखसार व राष्ट्रवादीच्या नयना किनगे या उमेदवार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com