परळीत धनंजय विरुद्ध पंकजा मुंडे लढत प्रतिष्ठेची बनलीय 

पुर्वीचा रेणापूर आणि आताच्या परळी मतदार संघाचा ४० वर्षांचा इतिहास पाहीला तर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाच वेळा तर तर पंकजा मुंडे यांनी दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. दिवंगत रघूनाथराव मुंडे आणि पंडितराव दौंड यांनीही मतदार संघातून विजय मिळविला.
dhananjay munde pankaja  Munde
dhananjay munde pankaja Munde

बीड : जुना रेणापूर आणि आताचा परळी मतदार संघ हा मुंडेंचाच बालेकिल्ला आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाच वेळा तर पंकजा मुंडे यांनी दोन वेळा या मतदार संघातून प्रतिनिधित्व केले आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंमुळे या मतदार संघाच्या लढतीकडे राज्याचे लक्ष असते. आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे या मतदार संघातील लढतीकडे राज्याच्या नजरा खिळल्या असून बाजी कोण मारणार याकडे लक्ष लागून आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी १९७८ साली सर्वप्रथम आताचा परळी आणि पुर्वीच्या रेणापूर मतदार संघातून निवडणुक लढविली. परंतु, त्यांना दिवंगत रघूनाथराव मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नंतर १९८० च्या निवडणुकीत ते विजयी झाले. तर, पुन्हा १९८५ ला दिवंगत मुंडेंचा जेष्ठ नेते पंडितराव दौंड यांनी पराभव केला. 

त्यानंतर १९९० ते २००४ अशा सलग चार निवडणुका दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी एकहाती जिंकल्या. २००९ साली गोपीनाथ  मुंडेंना  राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाल्यानंतर लोकसभा लढविली आणि जिंकली. त्यावेळी येथून धनंजय मुंडे यांना उमेदवारीची अपेक्षा होती. पंरतु, पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली आणि येथूनच मुंडे कुटूंबियांत दरी निर्माण झाली. 


त्यानंतर २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी २०१४ ची  विधानसभा बहिण पंकजा मुंडेंच्या विरोधात लढविली. परंतु, त्यांचा २५ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. परंतु, २००९ ची निवडणुक पंकजा मुंडे ३६ हजारांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. 


एकूणच २०१४ मध्ये मोदी लाट आणि दिवंगत गोपीनाथराव मुंडेंच्या निधनाची सहानुभुती असतानाही पंकजा मुंडेंच्या विजयी मतांचा आकडा कमी करण्यात धनंजय मुंडेंना यश आले होते. दरम्यान, पराभूत होऊनही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिलेले आहे. त्यामुळे ही निवडणुक त्यांच्यासाठीही ‘करो या मरो’अशीच म्हणावी लागेल. 


तर, मास लिडर आणि भाजपमधील प्रमुख नेत्या अशी ओळख असल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठीही ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान, या पाच वर्षांत पंकजा मुंडेंनी जिल्ह्यात  स्वत:सह पाच आमदार निवडून आणले. बहिण डॉ. प्रितम मुंडे यांना दोनदा खासदार म्हणून निवडून आणले आहे बीड जिल्हा परिषद  देशील त्यांनी फोडाफोडी करून भाजपच्या ताब्यात आणली  आहे.  केंद्र व राज्यात सत्तेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात आणि मतदार संघात केलेली विकास कामे ही जमेची बाजू आहे. 


तर, नगर पालिका, तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मिळविलेले वर्चस्वामुळे धनंजय मुंडे समर्थकांचा विश्वासही कमालीचा दुणावला आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत प्रितम मुंडेंनी परळी मतदार संघातून मताधिक्य  मिळविले असले तरी त्यानंतरही धंनजय मुंडेंनी मतदार संघातील बांधणीकडे अधिक लक्ष घातलेले आहे.


 दोघांकडूनही आगामी निवडणुकीसाठी सर्व ताकद पणाला लावली गेली आहे. पंकजा मुंडेंसाठी भगीनी खासदार डॉ. प्रितम मुंडे मतदार संघात तळ ठोकून आहेत. तर, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे ह्या देखील मागच्या काही महिन्यांपासून मतदार संघात अधिकच सक्रीय झाल्या आहेत. 


तसे, भाजपकडून पंकजा मुंडे याच मतदार संघातून उमेदवार असतील हे निश्चित असून दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मुंडे भावंडे समोरा - समोर येणार हे आता निश्चित झाले आहे. आता प्रश्न आहे काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या भूमिकेचा. 


आघाडीत काँग्रेसचा मतदार संघ राष्ट्रवादीकडे गेल्याची नाराजी समोर येणार आहे. तर, भाजपलाही शिवसेनेची नाराजी आहेच. तर, वंचित आघाडीकडून सभापती राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली असून जातीय समिकरणात विजयाचे गणित जुळविणार, असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. आता यावेळी मुंडेंची परळी कोणाकडे जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com