विद्यार्थी चळवळीत घडला राजकारणाचा श्रीगणेशा 

Parag Alavni
Parag Alavni

देशात 80 च्या दशकात काश्‍मिर, आसामसारखे ज्वलंत प्रश्‍न होते. सामाजिक प्रश्‍नांनी मन अस्वस्थ होत होते. वयाच्या 17 व्या वर्षी भाजपाचा सदस्य होण्याचा निर्णय मी घेतला. महाविदयालयात शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. भाजपचा सदस्य झालो असलो तरी सक्रीय काम करण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, अभाविपमध्ये काम करणारा मित्र सातत्याने कार्यरत असायचे जवळून पाहिले. त्यामुळे मीही बीएस्सीला असताना अभाविपच्या कामात झोकून दिले. विलेपार्लेसारख्या बहुभाषिक आणि गरीब मध्यमवर्गीय आणि श्रीमंती वस्ती असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना विद्यार्थी चळवळीत काम केलेल्या कामाचा आणि संस्काराचा आज फायदा झाला. 

विद्यार्थी चळवळीत असताना व्यक्तिमत्व विकास, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क कलेचा विकास झाला. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपाचे नेते दिवंगत प्रमोद महाजन हे आमचे राजकीय हिरो होते. विद्यार्थी परिषदेत काम करताना सत्ताधारी पक्षांच्या संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनांची महाविद्यालयात दादागिरी चालत होती. दहशतीला घाबरुन विद्यार्थी महाविद्यालयीन निवडणुकांपासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवताना, महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. 

मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कॉन्सिलचा सिनेट सदस्य म्हणून निवडून आलो. 'एनएसयुआय'चे सुरेश शेट्टी, नरेद्र वर्मा हे विरोधी संघटनांचे पदाधिकारी होते तर सध्याच्या मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह मुंबईतील अनेक सहकाऱ्यांबरोबर आम्ही एकदिलाने काम करत होतो. सिनेट सदस्य म्हणून काम करताना प्राध्यापक, विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याशी कसे बोलायचे आणि कोणता विषय मांडायचा याचा अनुभव मिळाला. भाजपमध्ये दिग्गज पदाधिकारी असतानाही सक्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली. 

1997 ते 2007 या काळात नगरसेवक तसेच 2014 पासून भाजपाचा आमदार म्हणून काम करताना महापालिका सभागृह आणि विधानसभेतही विद्यापीठातील कार्याच्या अनुभवांचा फायदा झाला. 

परिषदेत असताना महामंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयात असताना आठवड्यातून दोन बैठका व्हायच्या. एखादा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर उपस्थिती किती असेल, याचा अंदाज घेवून कार्यक्रमस्थळी खुर्च्या लावण्याचीही कामे केली. त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीबरोबरच श्रोता वर्ग कुठल आला आहे, त्यांची मानसिकता काय असेल याचा अनुभव परिषदेत काम करताना मिळाला. 
आज राजकारणात काम करत असताना, मोटारीतून कार्यक्रमासाठी जाणे होते. परंतु, त्यावेळी विलेपार्ले ते सहार, अंधेरी या भागात पायी चालून किंवा कधी कधी सायकलीवरुन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत. परिषदेत पुर्णवेळ काम करताना दुपारी भोजनासाठी पैसे लागत नव्हते. पुर्णपणे कार्यकर्ता म्हणून ज्या मित्रांच्या घरी जात असायचो तेथे मोठ्या आदराने स्वागत केले जायचे. आवडीचे जेवण काय हे विचारुन तसे जेवण करुन ठेवलेले असायचे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीची सवय परिषदेत असताना लागली. 

आजही मला पांढरे कपडे परिधान करणे आवडते
भाजपमधील दूरदृष्टी असलेले नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचा 1984 साली लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर माझ्या भाजपचे कार्यालय असलेल्या विलेपार्ले येथील कार्यालयात ते आले होते. त्यावेळी पराभवाने खचून न जाता, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे हे त्यांचे प्रोत्साहन देणारे भाषण आजही आठवते. 

विद्यार्थी हा देखील समाजाचा घटक असतो. समाजकारण करताना राजकारणात येणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांनी राजकारण हा पुर्णवेळ पेशा आहे याचे भान ठेवायला हवे. स्वतःच्या गरजा कमी करुन कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याला बाधा न येता, राजकारणासाठी वेळ दिला तरी भावी काळात चांगले विद्यार्थी राजकारणात येवू शकतात. निवडणुकीच्या राजकारणात आमदार, खासदार किंवा नगरसेवक पदाची संधी सगळ्यांना मिळेल याची शाश्‍वती नाही तरी, विद्यार्थी संघटनांतून राजकारणात उतरताना पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता किंवा खाजगी पीए म्हणून मानधनावर संधी मिळू शकते.

शब्दांकन - महेश पांचाळ, मुंबई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com