'पॅराडाइज'कडून  जयंत सिन्हा,   विजय मल्ल्या, नीरा राडियासह 714 भारतीयांच्या काळ्या  पैशाचा भांडाफोड 

note-bundal
note-bundal

नवी दिल्ली  :  पनामा पेपर गैरव्यहार प्रकरण उघडकीस येऊन दीड वर्षे झालेला असतानाच त्याच धर्तीवर मातब्बरांनी परदेशांमध्ये दडवलेला तथाकथित काळा पैसा ' पॅराडाइज पेपर्स'ने उजेडात आणला आहे. 

"पॅराडाइज'मुळे राजकीय, बड्या कंपनीचे उच्च अधिकारी, सेलिब्रिटी यांच्यासह शेकडो भारतीयांची आर्थिक गैरव्यवहारांबाबतची माहिती उजेडात आली असल्याचा अंदाज आहे. 

या यादीत जयंत सिन्हा आणि रविंद्र किशोर सिन्हा या दोन भाजप खासदारांचीही नावे आहेत. 

यात 714 भारतीय असून, पॅराडाइज पेपरमधील 180 देशांच्या यादीत भारत 19 व्या स्थानावर आहे. जयंत सिन्हा, अमिताभ बच्चन, विजय मल्ल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त, जगनमोहन रेड्डी यांचा पॅराडाइज पेपरमध्ये समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचा बर्म्युडातील एका कंपनीत भागीदारी असल्याचेही म्हटले आहे. 

"पॅराडाइज पेपर'च्या स्फोटक यादीमध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह जगभरातील 180 देशांतील अनेक अब्जाधीशांची नावे आहेत. परदेशांमध्ये पैसे ठेवणाऱ्यांत भाजप नेते यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा, दुसरे भाजपचे राज्यसभेचे खासदार रवींद्र किशोर सिन्हा यांची नावे आहेत.

 या दोघांबद्दलची माहिती 'ऑफशोअरलिक्‍स डॉट आयसीआयजे' या संकेतस्थळावर छायाचित्रासह दिली आहे. एका भारतीय वृत्तपत्रानेदेखील या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेची माहिती दिली आहे. आर्थिक व्यवहारासंबंधीची कागदपत्रे जर्मनीच्या वृत्तपत्र सुदेदाईश झायटूंगच्या हाती लागली असून, त्याचा तपास ' इंटरनॅशनल कंसोर्शियम ऑफ इन्वेस्टेगेटिव्ह जर्नालिस्टस'ने (आयसीआयजे) जगभरातील 96 वृत्तपत्रांच्या मदतीने केला आहे. 

पत्रकारांच्या या तपासात पथकात ' बीबीसी'चा देखील सहभाग आहे . या कागदपत्रांना ' पॅराडाइज पेपर' असे म्हटले जात असून, त्यात अब्जावधी व्यवहारांचा लेखाजोखा ठेवणारी १ कोटी ३४ लाख  कागदपत्रे उजेडात आले आहेत. करचुकवेगिरीसाठी नंदनवन समजल्या जाणाऱ्या १९ देशांत काळा पैसा ठेवण्यासाठी बर्म्युडातील ऍपलबाय आणि सिंगापूरची आशिया सिटी कंपनीची सेवा घेतल्याचे उघड झाले आहे. 

या सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचा खुलासा "पॅराडाइज'ने केला आहे. त्यातूनच जगातील मातब्बर राजकारण्यांनी, उद्योगपती, चित्रपटातील नामवंतांनी आपली मालमत्ता दडवली आणि कर चुकवल्याचे प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अजीज, नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी अध्यक्ष अयाज खान नियाजी यांचीही पॅराडाइजमध्ये नावे आहेत.अमेरिकेचे उद्योगमंत्री विल्बर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासाठी पैसे गोळा करणाऱ्यांचाही या यादीत समावेश आहे. 

शिवाय ट्विटर आणि फेसबुक या सोशल मिडियात रशियातील कंपन्यांनी पैसा गुंतवल्याचे पॅराडाईझने म्हटले आहे. पॅराडाईझ पेपरमध्ये असलेल्या भारतीय कंपन्यांत अपोलो टायर्स, एमार एमजीएफ, जीएमआर ग्रुप, हॉवेल्स, हिंदुजा, जिंदाल स्टिल आणि व्हिडिओकॉन यांचा समावेश आहे. 

जयंत सिन्हा : ज्या कंपन्यांनी करचुकवेगिरीसाठी नंदनवन समजल्या जाणाऱ्या देशात व्यवहार केला, त्यात ओमिडियार  नेटवर्कचा सहभाग आहे. राजकारणात येण्यापूर्वी जयंत सिन्हा या कंपनीशी निगडित होते. 

अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चन यांनी बर्म्युडा येथील एका कंपनीत भागीदारी केली होती. 2004 मध्ये ' लिबरालाइझ रेमिटान्स स्किम' येण्यापूर्वीच ते त्या कंपनीतून बाहेर पडले होते. 

सचिन पायलट : पायलट यांनी अन्य कॉंग्रेस नेत्यांसमवेत झिकत्झा हेल्थ केअर लिमिटेड कंपनी स्थापन केली होती. पेपरनुसार या कंपनीत मॉरिशसमध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपनीत भागीदारी होती. ही कंपनी ऍपलबायकडून सेवा घेतली होती.  

'सीबीडीटी'च्या नेतृत्वाखाली चौकशी समिती 

नवी दिल्ली :  पॅराडाईज पेपर्स गौप्यस्फोटामुळे सरकारही खडबडून जागे झाले असून, यात उघड झालेल्या नावांच्या चौकशीसाठी वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा समूह नेमण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे.

 केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे (सीबीडीटी) प्रमुख हे या समूहाचे नेतृत्व करतील. या चौकशी समूहात सीबीडीटीसह सक्तवसुली संचालनालय (ईडी), रिझर्व्ह बॅंक आणि एफआययू या संस्थांचे प्रतिनिधी असतील. दरम्यान, प्रसारमाध्यमांकडून अद्याप सर्व नावे जाहीर झालेली नाहीत.
 त्यामुळे प्राप्तिकर खात्याच्या चौकशी पथकांनाही दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. नाव जाहीर झाल्यांतर योग्य ती कार्यवाही या पथकाने करावी, असेही अर्थखात्यातर्फे सांगण्यात आले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com