आता संसदेत " पप्पू' व गोडसेपंथी शब्दही असंसदीय ! 

आता संसदेत " पप्पू' व गोडसेपंथी शब्दही असंसदीय ! 

नवी दिल्ली : बोलताना भाषेची मर्यादा व सभ्यता यांना काटेकोर महत्व देणाऱ्या संसदेत खासदारांनी आता पप्पू हा उल्लेख केला तर तो असंसदीय ठरणार आहे. पप्पू व गोडसेपंथी यासारखे शब्द कोणाची खिल्ली किंवा बदनामीच्या हेतूने वापरले तर ते सरळ कामकाजातून काढून टाकले जातील. याबाबत संसद सचिवालयाने काल दुरूस्ती केली. संसदेत म्हणजेच लोकसभेत असंसदीय शब्दांची भलीमोठी यादी आहे. सोळाव्या लोकसभेत विशिष्ट नेत्याविरूध्द पप्पू शब्दाचा वापर झाला तेव्हा त्यावेळच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आपल्या विशेषाधिकारात तो कामकाजातून काढून टाकला होता. पप्पू हे जर कोणाचे नावच असेल तर ते कामकाजात राहील. पण कॉंग्रेसचा एखादा नेता किंवा अन्य कोणाची खिल्ली उडविण्यासाठी तो शब्द संसदेत वापरला तर तो बाद ठरेल. 

या दुरूस्तीसाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याबाबत घडलेला किस्सा कारणीभूत आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर गोडसे हा शब्दच असंसदीय ठरविला गेला होता. त्यामुळे 2014 मध्ये गोडसे यांनी पहिल्यादा खासदार झाल्यावर जे जनहिताचे विषय मांडले त्यात त्यांचे नावच बाबूशाहीने गायब करून टाकले. यावर गोडसे यांनी, महाराष्ट्रात या नावाचे अनेक लोक राहतात असे नमूद केले. त्यानंतर गोडसे शब्द पुन्हा संसदीय शब्दावलीत आला. पण आता "गोडसेपंथी' असंसदीय ठरविला गेला आहे. 
असंसदीय शब्दांचा कोष 2009 मध्ये प्रकाशित झाला तेव्हा त्यात पप्पू शब्द असंसदीय नव्हता. 2019 मध्ये त्यात ज्या अनेक शब्दांची भर पडली त्यामध्ये बहनोई, दामाद यासारखे शब्दही आहेत. हे सारे शब्द एका घराण्याशी संबंधित वापरले जातात. स्वतः लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट निर्देश दिले ाहेत की त्यांच्या तोंडून जरी असे शब्द निघून गेले तरी ते सरळ कामकाजातून काढून टाकावेत. बिर्ला यांनी नुकतेच एका गोंधळी खासदाराला, ही बंगाल विधानसभा नसून संसद आहे, असे झापले होते. मात्र त्याच दिवसी संध्याकाळी तेही वाक्‍य कामकाजातून वगळले गेले होते. 

असंसदीय शब्दांची ठळक कारणे : 
- अध्यक्षांच्या आदेशाने हटविले जाणारे शब्द 
- अपशब्द, शिवीगाळ. 
- राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती, अध्यक्ष, राज्यपाल यासारख्या घटनात्मक पदांवरील व्यक्तींविरूध्द टिप्पणी 
- न्यायप्रविष्ठ खटल्यांवरील भाष्य 
- कोणत्याही न्यायालयाविरूध्द किंवा सेवेतील न्यायमूर्तींविरूध्दचे वक्तव्य 
-मित्र देशांचे अध्यक्ष व अन्य वरिष्ठ नेत्यांवरील टीका. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com