Panvel : Tussle between BJP and Shekap For Mayorship | Sarkarnama

पनवेल महापालिकेच्या निवडणूकीत सत्तेसाठी भाजपा व शेकापमध्येच खरा संघर्ष !

संदीप खांडगे पाटील : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सत्ता मिळविण्यासाठी भाजपा आणि शेकाप या दोन पक्षातच खरी लढत होण्यातच दाट शक्यता आहे. अन्य पक्ष अस्तित्वासाठी निवडणूक रिंगणात सहभागी होत असून कोणाला बहूमत कमी पडल्यास टेकू लावण्याइतपतच अन्य पक्षाचा उपयोग होणार असल्याचे पहावयास मिळत आहे.

नवी मुंबई: पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीकरता  तारखा कोणत्याही क्षणी जाहिर होणार असल्या तरी निवडणूकीच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी भाजपा आणि शेकाप या दोन पक्षातच खरी लढत होण्यातच दाट शक्यता आहे. अन्य पक्ष अस्तित्वासाठी निवडणूक रिंगणात सहभागी होत असून कोणाला बहूमत कमी पडल्यास टेकू लावण्याइतपतच अन्य पक्षाचा उपयोग होणार असल्याचे पहावयास मिळत आहे.

पनवेल नगर परिषदेचे 1 ऑक्टोबर 2016 रोजी महानगरपालिकेत रूपांतर झाले असून या महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. या महानगरपालिकेचे 78 मतदारसंघ असून 20 प्रभागात होत असलेल्या या निवडणूकीत 19 प्रभागामध्ये 4 मतदारसंघ व एका प्रभागामध्ये दोन मतदारसंघाचा समावेश आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील 78 प्रभागांमध्ये 40 शहरी तर 38 मतदारसंघांचा ग्रामीण भागात समावेश होत आहे.

शहरी भागामध्ये भाजपाचा प्रभाव असून ग्रामीण भागामध्ये शेकापचा प्रभाव आहे. तथापि 40 शहरी प्रभागांमध्ये  9 ते 10 ठिकाणी शेकापचा प्रभाव असल्याने आणि तेच चित्र भाजपाचे ग्रामीण भागात असल्याने शेकाप व भाजपाला स्पष्ट बहूमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे आजच्या घडीला पहावयास मिळत आहे. 4 लाख 38 हजार मतदार महापालिका निवडणूकीत महापालिकेच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या याचा निर्णय घेणार असले तरी कडक उन्हामुळे व उन्हाळी सुट्टीत अनेक मतदार गावी गेल्याचा फटका प्रस्थापितांना बसण्याची दाट शक्यता आहे.

मावळ्त्या नगरपरिषदेत 38 नगरसेवकांचे संख्याबळ होते. यामध्ये काँग्रेसचे 21, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि शेकापचे 13 नगरसेवक होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस सोडून भाजपाच्या कमळाची कास धरल्यावर 21 काँग्रेसच्या नगरसेवकांपैकी 19 नगरसेवकांनी रामशेठ ठाकूरांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवित भाजपात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असलेल्या दोन नगरसेवकांपैकी एका नगरसेवक ठाकूर परिवाराच्या संपर्कात असून लवकरच त्याचाही भाजपा प्रवेश होणार आहे.

भाजपाचा विचार करावयाचा झाल्यास पनवेल निवडणूकीची सूत्रे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीण दरेकर, पनवेल संपर्कप्रमुख सतीश धोंड, पनवेल शहरप्रमुख जयंत पगडे यांच्याकडे राहण्याची शक्यता असली तरी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याच कलानुसार तिकीट वाटपासह प्रचाराची रणनीती ठरणार असल्याचे जगजाहीर आहे. शेकापची सर्व धुरा माजी आमदार विवेक पाटील या एकखांबी नेतृत्वावर अवलंबून राहणार आहे. माजी नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते व गटनेते संदीप पाटील यांच्या मदतीचा शेकापला फायदा होणार आहे.

भाजपा व रिपाई आणि शिवसेना ही महायुती एकीकडे आणि शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे ही आघाडी दुसरीकडे यांच्यातच खरी चुरस होणार आहे. एमआयएम जरी निवडणूक रिंगणात सहभागी होत असली तरी या निवडणूकीत एमआयएमचे फारसे उपद्रवमूल्य जाणवणार नाही. विसर्जित नगरपरिषदेत पनवेल मोहल्ला भागातून दोन मुस्लिम नगरसेवक निवडून आले होते. यंदा तळोजा भागात मुस्लिम मतदारांची वाढ झाल्याने त्या भागातून एक मुस्लिम नगरसेवक निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पनवेलमधील काँग्रेसला घरघर लागली आहे, ती अद्यापि थांबलेली नाही. रायगड जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, अ‍ॅड. के.सी.पाटील आणि भक्तिकुमार दवे आदी मंडळींना काँग्रेसची पडझड थांबविण्याचे अग्निदिव्य महापालिका निवडणूकीत करून दाखवावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेही भाजपा व शेकापच्या तुलनेत राजकीय उपद्रवमूल्य कमी असून सुनील मोहोड, सुनील घरत, शिवदास कांबळे, रामदास शेवाळे या स्थानिक नेतृत्वाला पालिका निवडणूकीच्या माध्यमातून पक्षामागे असलेला जनाधार वरिष्ठांना दाखवून द्यावा लागणार आहे. उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर हेच शिवसेनेची पनवेल महापालिकेची सूत्रे सांभाळणार असून ज्येष्ठ नेते बबनदादा पाटील हे सल्लागाराच्या भूमिकेत प्रचारादरम्यान दिसण्याची शक्यता आहे. मनसे व एमआयएमचा या निवडणूकीत फारसा प्रभाव दिसून येणार नाही.

शेकाप आणि भाजपातच पालिका निवडणूकीसाठी खरी चुरस असली तरी शहरी व ग्रामीण दोन्ही ठिकाणच्या मतदारांचा दोन्ही पक्षांकडे समान झुकते माप असल्याने बहूमतासाठी खरी अडचण होणार आहे. शिवसेनेला मिळणार्‍या जागा भाजपाला सत्तेसाठी तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार्‍या जागा शेकापला सत्तेसाठी उपयुक्त ठरणार आहे. आयुक्तपदावरून सुधाकर शिंदेंची करण्यात आलेली तडकाफडकी बदली सत्ताधारी भाजपाला पालिका प्रचारात काही प्रमाणात अडचणीची बाब ठरणार आहे. पनवेल संघर्ष समिती आयुक्त बदलीवरून पनवेल ते मंत्रालय रान पेटवित असताना संघर्ष समितीचा पाठिंबा व भूमिका निवडक प्रभागामध्ये प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख