पनवेल महापालिका : नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसणार ? - Panvel news - PMC standing comittee chairman election | Politics Marathi News - Sarkarnama

पनवेल महापालिका : नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसणार ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मी आणि मनोहर म्हात्रे आम्ही दोघे नाराज आहोत, ही गोष्ट खरी आहे. मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहूनच आम्ही काम करणार आहोत.
- एकनाथ गायकवाड, नगरसेवक

नवीन पनवेल : पनवेल महापालिकेच्या विषय समिती आणि स्थायी समिती सभापतिपदासाठी
उद्या बुधवारी निवडणूक होणार आहे. आठ विषय समित्यांसाठी भाजपतर्फे आठच अर्ज आल्यामुळे
तसेच स्थायी समिती सभापतिपदासाठी अमर पाटील यांचा एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. असे असले तरी, स्थायी समिती सभापतिपदावरून खांदा कॉलनीतील भाजपचे मनोहर म्हात्रे आणि एकनाथ गायकवाड हे दोन खंदे नगरसेवक नाराज आहेत. 

पनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती नुकतीच झाली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपने वर्चस्व राखले आहे. स्थायी समितीवर भाजपच्या वाट्याला 10, तर शेकाप आघाडीला सहा जागा आल्या आहेत. भाजपकडून स्थायी समितीवर नगरसेवक परेश ठाकूर, संतोष भोईर, नेत्रा पाटील, रामजी बेरा, अमर पाटील, गोपीनाथ भगत, कुसूम म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजय भोपी, तेजस कांडपिळे यांची निवड करण्यात आली आहे. शेकाप आघाडीकडून नगरसेवक प्रीतम म्हात्रे, डॉ. सुरेख मोहोकर, गिरीश केणी, भारती चौधरी, गोपाळ भगत, सतीश पाटील यांना संधी देण्यात आली आहे. 

महापालिकेत शक्तिशाली समजल्या जाणाऱया स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गत कलहाला सुरवात झाली असल्याचे दिसून येत आहे. स्थायी समिती सभापतिपदी कळंबोली येथील तरुण नगरसेवक अमर पाटील यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या पदावरून भाजपचे मनोहर म्हात्रे व एकनाथ गायकवाड हे दोन नगरसेवक नाराज झाले आहेत. यापैकी मनोहर म्हात्रे स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांच्या नाराजीचा परिणाम खांदा कॉलनी या भाजपच्या अभेद्य किल्ल्यावर होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख