पनवेल महापालिकेत शीतयुद्ध? - Panvel municipal corporation cold war | Politics Marathi News - Sarkarnama

पनवेल महापालिकेत शीतयुद्ध?

सुजित गायकवाड
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नागरिकांच्या मागणीनुसार आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना महापालिकेत पुन्हा आणण्यासाठी आग्रही असलेल्या सत्ताधारी भाजपला आता त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते नकोसे झाले आहेत. याची प्रचीती शनिवारी महापालिकेत हास्यकलाकार भाऊ कदम यांना "स्वच्छतादूत' म्हणून नियुक्तीच्या कार्यक्रमात आली. या कार्यक्रमावरही सत्ताधाऱ्यांकडून बहिष्कार टाकण्यात आला. 

पनवेल : नागरिकांच्या मागणीनुसार आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना महापालिकेत पुन्हा आणण्यासाठी आग्रही असलेल्या सत्ताधारी भाजपला आता त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते नकोसे झाले आहेत. याची प्रचीती शनिवारी महापालिकेत हास्यकलाकार भाऊ कदम यांना "स्वच्छतादूत' म्हणून नियुक्तीच्या कार्यक्रमात आली. या कार्यक्रमावरही सत्ताधाऱ्यांकडून बहिष्कार टाकण्यात आला. 

शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे सत्र सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहे. महापालिकेच्या पहिल्या वर्धापनदिनी कोनशिला अनावरणाच्या कार्यक्रमात झालेल्या "मानापमान' नाट्यात सत्ताधाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
देशभरात प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या "स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत सर्व शहरांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. या योजनेत पनवेल महापालिकेला अव्वल स्थान मिळावे यासाठी आयुक्तांनी कंबर कसली आहे. 

शहरात कचरा सर्वेक्षणावर भर देण्याबरोबरच 24 तास कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. याच योजनेची प्रभावी जागृती व्हावी यासाठी शिंदेंनी सध्या राज्यात प्रसिद्ध असलेले हास्यकलाकार भाऊ कदम यांना महापालिकेचा स्वच्छतादूत होण्याची विनंती केली. 

भाऊंनीही कसलीही अपेक्षा न करता होकार कळवला. भाऊ व्यस्त असल्याने प्रशासनाने शनिवारी घाईघाईत शनिवारी रात्री स्वच्छतादूत घोषित करण्याचा कार्यक्रम घेतला. एखादा कलाकार कोणत्याही फायद्याची अपेक्षा न करता तत्काळ समाजहितासाठी पुढे येत असेल तर त्याला प्रतिसाद देणे ही महापालिकेची चूक होती, असे सत्ताधाऱ्यांच्या वर्तनावरून वाटत आहे. 

दूरध्वनीवर आमंत्रण दिल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील, नगरसेविका प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर व हेमलता गोवारी यांनी हजेरी लावली. याआधी देखील नाव न छापल्याने कोनशिलेच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगले होते. 

अधिकारावरून गोंधळ 
पनवेल नगर परिषद असताना मुख्याधिकाऱ्यांपेक्षा नगराध्यक्षांचे अधिकार जास्त असतात; परंतु महापालिकेत महापौरांपेक्षा आयुक्तांना सर्वाधिकार असतात. महापालिकेचा गाडा हाकताना मुख्याधिकारी व आयुक्त यांच्यातील फरक लोकप्रतिनिधींच्या बहुधा लक्षातच आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय निर्णयांमध्ये अनेकदा लोकप्रतिनिधींकडून नाक खुपसले जात असल्याने नेमके ऐकायचे कोणाचे, या द्विधेत महापालिकेचे कर्मचारी आहेत. 

भाऊ कदम प्रसिद्ध कलाकार असून त्यांच्यामुळे स्वच्छतेच्या कामाला गती मिळेल यात काही शंका नाही; परंतु आम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी असून आम्हाला हा कार्यक्रम ठरवताना आयुक्तांकडून विचारात घेतले गेले नाही. मग आम्ही प्रशासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित का राहायचे? 
- परेश ठाकूर, सभागृहनेते 

शनिवारच्या कार्यक्रमाची कल्पना शुक्रवारी महापौर, सभागृहनेते, सर्व समित्यांचे सभापती यांना फोनवरून देण्यात आली होती. भाऊ कदमांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातूनही लगेच वेळ दिल्याने कार्यक्रम घाईत घेण्यात आला. 
- संध्या बावनकुळे, उपायुक्त

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख