panvel commisionar | Sarkarnama

आयुक्तांच्या बदलीविरोधात पवनेलकरांमध्ये संताप

तुषार खरात
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई ः अतिक्रमणे, बेकायदा कामे, अनधिकृत धंदे याविरोधात धडक मोहीम राबवून अवघ्या सहा महिन्यांत पनवेलचा कायापालट करणारे महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची राज्य सरकारने बदली केल्याने पनवेलकरांमध्ये संताप उसळला आहे. डॉ. शिंदे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी पनवेलकरांनी येत्या 27 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे. 

मुंबई ः अतिक्रमणे, बेकायदा कामे, अनधिकृत धंदे याविरोधात धडक मोहीम राबवून अवघ्या सहा महिन्यांत पनवेलचा कायापालट करणारे महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची राज्य सरकारने बदली केल्याने पनवेलकरांमध्ये संताप उसळला आहे. डॉ. शिंदे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी पनवेलकरांनी येत्या 27 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे. 

"पनवेल महानगरपालिका बचाव संघर्ष समिती'च्या झेंड्याखाली लोकांनी एकत्र येऊन आंदोलनाची हाक दिली आहे. एका मंत्र्यांचे नातलग असल्याचे कारण दाखवून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डॉ. शिंदे यांची राज्य सरकारने बदली केली आहे. मात्र अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नसल्याने हे कारण अत्यंत थातूरमातूर असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष कांतिलाल कडू यांनी केला आहे. केवळ बेकायदा कामांवर केलेल्या कारवाईमुळे काही प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्तांची ही कार्यपद्धत अशीच कायम राहिली तर नव्या महापालिकेत आपला प्रभाव राहणार नाही, अशा भीतीतून प्रस्थापितांनी बदलीचे षडयंत्र रचल्याचाही आरोप कडू यांनी केला आहे. 

येत्या 27 मार्च रोजीच्या आंदोलनात सामान्य पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. डॉ. शिंदे यांच्या बदलीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही नाराजी व्यक्त केली असून ते मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त करणार असल्याचे कडू म्हणाले.

बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. 
डॉ. शिंदे हे कार्यक्षम अधिकारी आहेत. रस्ते व्यापून टाकलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे लोकांना आता रस्त्यांवर मुक्त संचार करता येतो. तब्बल 22 हजार बॅनर्स काढल्याने शहराला आलेली अवकळा नाहीशी झाली. विटभट्ट्या हटविल्याने प्रदूषणाचा त्रास कमी झाला, कंत्राटदारांवर वचक बसवून त्यांच्या कामांमध्ये गुणवत्ता आणली. स्वच्छता मोहीम धडाक्‍यात राबविली. अशी अनेक चांगली कामे डॉ. शिंदे यांनी केली आहेत. त्यांच्या कामावर पनवेलकर खूष आहेत, असेही कडू म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख