Panvel BJP workers prefer Ashish Shelar as campaign incharge | Sarkarnama

पनवेल भाजपेयींची मनपा प्रचारांकरता आशिष शेलारांना पसंती!

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 20 एप्रिल 2017

महापालिका कार्यक्षेत्रातील 78 मतदारसंघापैकी 40 शहरी भागात व 38 ग्रामीण भागात मोडतात. शहरी भागात भाजपाचा आणि ग्रामीण भागात शेकापचा प्रभाव असला तरी शहरी भागातील 10 ते 12 मतदारसंघात शेकापचा असणारा प्रभाव भाजपासाठी चिंताजनक बाब आहे.

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीच्या तारखेची बुधवारी घोषणा झाली असून भाजपासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणूकीसाठी भाजपाने जय्यत तयारी केल्याचे पहावयास मिळत आहे.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अन्य पाच कँबिनेट मंत्र्यांना भाजपा प्रचार अभियानात सहभागी करून घेणार असले तरी तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांची व पदाधिकार्‍यांची आशिष शेलारांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. 

24 मे रोजी पनवेल महापालिकेकरीता मतदान होणार असून 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पनवेल परिसरावर पूर्वी लाल बावट्याचा पर्यायाने शेकापचा अधिक काळ राजकीय प्रभाव होता. त्यानंतर रामशेठ ठाकूरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर हा परिसर काँग्रेसमय झाला. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूरांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ठाकूरांचे राजकीय वलय आणि मोदी लाटेचा प्रभाव याचा मिलाफ होवून प्रशांत ठाकूर भाजपाच्या तिकीटावर आमदार झाले आहे. 
पनवेल कार्यक्षेत्रात भाजपाचा आमदार असल्याने पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीत महापालिकेवर कमळ फुलविणे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. 

महापालिका कार्यक्षेत्रातील 78 मतदारसंघापैकी 40 शहरी भागात व 38 ग्रामीण भागात मोडतात. शहरी भागात भाजपाचा आणि ग्रामीण भागात शेकापचा प्रभाव असला तरी शहरी भागातील 10 ते 12 मतदारसंघात शेकापचा असणारा प्रभाव भाजपासाठी चिंताजनक बाब आहे. अटीतटीच्या झुंजीमध्ये शेकाप विजयी ठरू नये म्हणून यापूर्वी स्वबळाची चाचपणी करणार्‍या भाजपाला शिवसेनेला सोबत घेण्याची वेळ आली आहे.

भाजपाकडून स्थानिक पातळीवर रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर या पितापुत्रांवर भर असला तरी प्रचार अभियानामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्यासह अन्य दोन मंत्र्यांचा भाजपाकडून भर देण्यात येणार आहे. शेकापकडून प्रचारादरम्यान होणारा घणाघाती हल्ला लक्षात घेता भाजपाची ही मंत्र्यांची फौज प्रभावी कितपत ठरतील असा संशय स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांकडून व पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

त्यातच पनवेलवासियांसोबत खुद्द भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्यावर कमालीचे नाराज आहे. एरव्ही अडीच वर्षाच्या कालावधीत पनवेल परिसराकरिता ‘मिस्टर इंडिया’ बनलेले प्रकाश महेता प्रचारादरम्यान फारसे उपयुक्त ठरणार नसल्याचे भाजपाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूकीतील अनुभव लक्षात घेता शेकापच्या आक्रमक रणनीतीला अंगावर घेण्यासाठी आशिष शेलारांसारखा खमक्याच पाहिजे अशी भावना भाजपा कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेकापच्या तोफखान्याला शेलारांनी सांभाळल्यास अन्य पक्षांचे राजकीय दडपण काहीही नसल्याचे भाजपा कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. त्यातच कोकणात काम करण्याची जबाबदारी पक्षाने द्यावी अशी इच्छा आशिष शेलारांनी काही दिवसापूर्वीच व्यक्त केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पनवेल निवडणूकीच्या प्रचाराची जबाबदारी आशिष शेलारांवर सोपवून त्यांच्या इच्छेचा मानही पक्षाने राखल्यासारखा होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख