पंकजा मुंडे समर्थकांचा जयदत्त क्षीरसागरांना इशारा , परिणाम भोगावे लागतील !

त्यानंतर खुद्द क्षीरसागरांनी आपल्या फेसबुक वॉलवर या योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पंकजा मुंडे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट केली.
cm-Kshirsagar-munde
cm-Kshirsagar-munde

बीड : मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये बीडचा समावेश आणि यासाठी तब्बल ४ हजार ८०० कोटी रुपये निधीच्या प्रकल्प अहवालाला मंगळवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी मिळाली. मात्र, या योजनेचे फुकटचे श्रेय जयदत्त क्षीरसागर घेत असल्याची टिका पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावरुन केली. अगदी याचे परिणाम विधानसभेला भोगावे लागतील, असे इशारेही सोशल मिडीयावरुन दिल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनीही रिव्हर्स गिअर टाकत अगदी या योजनेबद्दल पंकजा मुंडेंच्याच अभिनंदनाची पोस्ट स्वत:च्या वॉलवर टाकली.

कायम दुष्काळी मराठवाड्याला वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून काहीसा दिलासा मिळणार  आहे. दरम्यान, या योजनेत बीडचा समावेश नसल्याची चर्चा मधल्या काळात सुरु झाली होती. दरम्यान, मंत्री झाल्यानंतर प्रत्येक भाषणात जयदत्त क्षीरसागर यांनी वॉटरग्रीड योजनेच्या मुद्द्यावर भर दिला होता. या योजनेत बीडचा समावेश होणारच आणि त्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचाही दावा त्यांच्याकडून केला जाई. 

मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी चार दिवसांपूर्वी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाड्यासाठी ५७० दलघमी पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीवेळी त्यांनी बबनराव लोणीकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर केला. दरम्यान, मंत्रीमंडळाने मान्यता दिलेल्या मराठवाडा वॉटरग्रीड योजनेत बीडचाही समावेश होता. या योजनेतून सर्वच तालुक्यांत मिळून १ हजार ७९ अंतराच्या पाईपलाईनद्वारे २५५ दसलक्ष लिटर पाणी जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे. 

 यानंतर पंकजा मुंडे यांच्यामुळेच या योजना मंजूर झाल्याचे पत्रक त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले. तर, जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयातून त्यांनी या योजनेची माहिती दिली अशा आशयाचे पत्रक निघाले. परंतु, त्यांच्या समर्थकांनी मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे योजनेला मंजूरी अशा पोस्ट सोशल मिडीयावरुन व्हायरल करायला सुरुवात केली . 

त्यामुळे  पंकजा मुंडे समर्थकांचा पारा पुरता चढला. पंकजा मुंडेंमुळे मंजूर झालेल्या योजनेचे फुकटचे श्रेय जयदत्त क्षीरसागर यांनी घेऊ नये, जयदत्त क्षीरसागर यांचे वरातीमागून घोडे अशा एक ना अनेक टिकांचा भडीमार तर केलाच. शिवाय याचे परिणाम विधानसभेला भोगावे लागतील असे इशारेही दिले. 

त्यामुळे सुरुवातीला योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जयदत्त क्षीरसागर यांचे आभार मानणाऱ्या सोशल मिडीयावरील पोस्ट जयदत्त क्षीरसागर समर्थकांनी हटवून थेट योजना मंजूर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व पंकजा मुंडेंचे आभार अशा पोस्ट केल्या. अगदी अशीच पोस्ट मंत्री क्षीरसागर यांच्या फेसबुकवरही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com