पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांना पक्षातर्गंत कारवाया करून पाडले :खडसे
विशेष म्हणजे ज्यांनी हे काम केले त्यांची नावे आम्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्याकडे दिलेली आहेत. त्याचे पुरावेपण दिलेले आहेत. -एकनाथराव खडसे
जळगाव : पंकजा मुंडे, ऍड.रोहिणी खडसे यांचा पराभव झालेला नाही, पक्षातर्गंत कारवाया करून त्यांना पाडण्यात आले आहे. ज्यांनी अंतर्गत हे कारस्थान केले आहे. त्यांची नावे आम्ही पक्षाकडे दिलेली आहेत, मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही.
त्यामुळे पंकजा मुंडेसह राज्यात अनेक जण अस्वस्थ आहेत. 12 डिसेंबरला काय निर्णय होणार ? याची प्रतिक्षा करा. आपणही गोपीनाथ गडावर जाणार आहोत. असे खळबळजनक विधान भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केले.
एकनाथराव खडसे आज जळगावात आले होते. शिवराम नगरातील 'मुक्ताई' निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा केली. पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, पंकजा मुंडेसह भाजपतच अस्वस्थता आहे. पंकजा मुंडे या निवडणूकीत पराभूत झालेल्या नाहीत, त्यांना पाडण्यात आले.असे त्यांचे मत आहे.
त्याचप्रमाणे मुक्ताईनगरातूनही ऍड.रोहिणी खडसे यांना पाडण्यात आले. पक्षातर्गंत कारवाया करून हेतुपुरस्सरपणे त्यांना पाडण्यात आले आहे.विशेष म्हणजे ज्यांनी हे काम केले त्यांची नावे आम्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्याकडे दिलेली आहेत.
त्याचे पुरावेपण दिलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. मात्र पक्षाच्या वरीष्ठांनी अद्यापही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे. मला राज्यातून अनेक अस्वस्थ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोन आले आहेत, असेही श्री. खडसे म्हणाले .
कोणीही विचारीत नाही
विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांशी नेत्यांशी आपुलकीने कोणीही चर्चा केलीली नाही. पराभव झाल्याबाबतची कारणमिमांसाही नेतृत्वाने केलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोणीही विचारीत नाहीत अशी भावना पराभूत झालेल्याची आहे. त्यामुळेही ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, पक्षाच्या नेत्यांनी पराभूत झालेल्यांना बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी.
बारा तारखेची प्रतिक्षा करा
पंकजा मुंडे या अस्वस्थ असल्यामुळे त्या काय निर्णय घेणार हे आपल्याला माहिती नाही, परंतु त्या पक्षातंराचाही निर्णय घेवू शकतात. त्यामुळे बारा डिसेंबर पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. आपण गोपीनाथ गडावर जाणार काय?
या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले कि, (कै.)गोपीनाथ मुंडे असतांना आपण अनेक वेळा भगवान गडावर गेलो आहे. मात्र आता जर पंकजा मुंडेंनी बोलावले तर आपण बारा डिसेंबरला गोपीनाथ गडावर जाणार आहोत.मात्र आपला पक्षांतर करण्याचा कोणताही विचार नाही , हे सुध्दा त्यांनी शेवटी सांगितले.

