मेटे मुख्यमंत्र्यांकडे होते तेंव्हाच  पंकजा मुंडेंनी मेटे गटाचे दोन झेड .पी. मेंबर फोडले 

राज्यात महायुतीसोबतच पण जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या अहंकाराचा कडेलोट करण्यासाठी विरोध अशी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचे दोन समर्थक झेडपी सदस्य गळाला लावून पंकजा मुंडे यांनी त्यांना चांगलाच ठोशास ठोसा लगावला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घटकपक्ष नेत्यांच्या बैठीक असतानाच या सदस्यांच्या गळ्यात कमळाचे झेंडे पडले हे विशेष.
मेटे मुख्यमंत्र्यांकडे होते तेंव्हाच  पंकजा मुंडेंनी मेटे गटाचे दोन झेड .पी. मेंबर फोडले 

बीड : राज्यात महायुतीसोबत व जिल्ह्यात भाजपला विरोध अशी भूमिका नुकतीच शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी घेतली होती. पण, त्यांचे दोन झेडपी सदस्य फोडून मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना चांगलाच धक्का दिला. विशेष म्हणजे आज कोल्हापूर येथे होत असलेल्या महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलाविली घटक पक्षांची बैठक मुंबईत संपताच बीडमध्ये त्यांचे शिलेदार भाजपवासी झाले. 

शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के यांनी मेटे यांची साथ सोडलेली आहे. आता त्यांच्यासोबत केवळ भारत काळे हे एकच सदस्य आहेत.

मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनीच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार विनायक मेटे यांच्यात राजकीय अंतर पडले. जिल्हा परिषदही एकमेकांच्या विरोधात लढविली. मात्र, जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या निमित्ताने या दोन नेत्यांत मनोमिलन झाले. मात्र, जिल्हा परिषदेच्या करभरावरूनच पुन्हा या दोघांत पुन्हा अंतर पडले. जिल्हा परिषदेच्या कारभारात विश्वासात घेतले जात नाही, निधी देताना अन्याय केला जातो अशी ओरड मेटे यांचे तत्कालीन समर्थक राजेंद्र मस्के नेहमी करत.

मस्के यांची मर्जी सांभाळण्यासाठी मेटे ही कैफियत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि येथूनच दोघांत खटके उडायला सुरुवात झाली. पण, हा खटका उडण्याचे कारण असलेले मस्केच मेटे याना सोडून भाजपच्या जवळ गेले. नंतर या दोघांतील राजकीय संघर्ष टोकाला पोचला. विविध माध्यमांतून दोघे एकमेकांना शह - काटशह देत आहेत. दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून नेहमी अपमान, निधी वाटपात, विकास कामांत अन्याय होत आहे. त्यांना राजकीय अहंकार असल्याचा थेट करत शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत पण बीडमध्ये विरोधात अशी भूमिका विनायक मेटे यांनी जाहीर केली होती.

त्यांच्या या भूमिकेला मुंडे यांनी त्यांचेच दोन सदस्य फोडून चांगलाच धक्का दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मंत्री रामदास आठवले, मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे या घटक पक्षनेत्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी विधानसभेला काढू असा शब्द दिला. सर्वांना कोल्हापूर येथे आज होत असलेल्या मेळाव्याचे निमंत्रणही दिले. मात्र, ही बैठक संपताच काही वेळाने बीडमध्ये मेटे यांच्या दोन समर्थकांना पंकजा मुंडे यांनी गळाला लावले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com