Pankaja Munde taunts Dhanajay Munde | Sarkarnama

वारसा मुंडे साहेबांचा सांगतात अन नाव दुसऱ्याचे घेतात: पंकजांचा हल्लाबोल

दत्ता देशमुख 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त बुधवारी गोपीनाथगडावर पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांनी अभिवादन केले. यानंतर आरोग्य शिबीराच्या उदघाटन कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी टिकास्त्र सोडले.

बीड : "मुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले. पण, आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेकांना त्यांनी घडवले, दुःखावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या काही जण एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नाव मात्र दुसऱ्याचे घेतात असा दुटप्पी पणा फार काळ चालणार नाही,"असा हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केला. 

त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा रोख त्यांचे राजकीय विरोधक असलेले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर होता. 

"माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका, समोरुन वार करा, हारले तर सन्मानाने हार स्विकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल," असा घाणाघातही त्यांनी केला.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर त्यांनी अभिवादन केले. यानंतर दोन दिवसीय आरोग्य शिबीर आणि विविध शासकीय उपक्रमांच्या लाभार्थींना योजना वाटपाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी वरील घणाघात केला.

" लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले, त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला . गोपीनाथ गडावर बोललेला शब्द खरा ठरतो त्यामुळे देशात पुन्हा 'कमळ'च फुलणार आहे ," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर, खासदार डॉ. प्रितम मुंडे, दादा इदाते, आमदार आर. टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, आमदार सुरेश धस, आमदार सुधाकर भालेराव, आमदार मोहन फड, आमदार मोनिका राजळे, आमदार पवार, गोविंदराव केंद्रे उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख