जयदत्त क्षीरसागरांबाबत पंकजा मुंडे पॉझिटीव्हच; सभाही घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या दसरा मेळाव्यात जयदत्त क्षीरसागरांना विशेष व्यासपीठावर स्थान होते.
pankaja-tai-Jaydattaa-anna
pankaja-tai-Jaydattaa-anna

बीड : विरोधकांकडून असलेल्या सर्व शंका - कुशंकांना मंगळवारच्या दसरा मेळाव्यानंतर पूर्णविराम मिळाला असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी पॉझिटीव्हच असल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे पंकजा मुंडे जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी गुरुवारी सभा घेणार आहेत.

क्षीरसागर - मुंडे घराण्यांमध्ये पुर्वीपासून सख्य आहे. अगदी जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत असतानाही पंकजा मुंडे यांनी त्यांनी शिफारस केलेल्या कामांना सढळ हाताने विकास निधी दिला. जयदत्त क्षीरसागर यांनीही लोकसभा निवडणुकीत विकास कामांना केलेल्या मदतीची जाण ठेवत पंकजा मुंडे यांच्या बहिण डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले.

 दरम्यान, अलिकडे क्षीरसागर विरोधक आणि भाजपातील काही मंडळींकडून पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर यांच्यात दुरावा आल्याचा प्रचार सुरु केला होता. परंतु, मंगळवारी साचवरगाव घाट या संत भगवानबाबांच्या जन्मभूमी पंकजा मुंडे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यात रोहयो आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना खास निमंत्रण होते. मेळाव्यात दोन व्यासपीठे होती. एक केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व एक इतरांसाठी. 

शहांच्या व्यासपीठावर मोजक्याच मंडळींना जागा होती. यात क्षीरसागर यांच्यासाठीही खुर्ची होती हे विशेष. मेळाव्यातील उपस्थितीनंतरच या दोघांत कुठलाच दुरावा नसल्याचे स्पष्ट झाले. बीडमधून शिवसेनेकडून निवडणुक लढविणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी पंकजा मुंडे पॉझिटीव्ह असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

आता तर पंकजा मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी रायमोह येथे सभा लावली आहे. रायमोह जिल्हा परिषद गटात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यामुळे रायमोह येथे सभा आयोजित केली आहे. येथे पंकजा मुंडे यांची सभा झाल्याने मतदार संघातील इतर भाजपजनांनाही जयदत्त क्षीरसागर यांच्या मागे ताकद लावण्याचा संदेश जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com