pankaja munde shows lotus in facebook post | Sarkarnama

ट्विटरवरून गायब झालेले `कमळ` पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर झळकले 

जगदिश पानसरे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पंकजा मुंडे या आपल्याबद्दलच्या राजकीय चर्चांना खोटे ठरवत आपण भाजप सोबतच असल्याचे सध्या तरी दाखवत आहेत.

औरंगाबाद : भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटरवरून काल भाजपचे चिन्ह असलेले कमळ गायब झाल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते . राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पंकजा मुंडे कुठल्याही पक्षात जाणार नाही याचा खुलासा करण्यासाठी समोर यावे लागले होते. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांनीदेखील यू-टर्न घेतल्याचे दिसत आहे .

ट्विटरवरून गायब झालेले भाजपचे कमळ आज पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर झळकल्याने भाजपच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडल्याची चर्चा आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमित्त पंकजा यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते व चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे आपले कार्यकर्ते व समर्थकांचा पासून दूर होत्या पंकजा मुंडे यांच्या प्रभावासाठी भाजपच्या राज्य व स्थानिक नेत्यांनी हातभार लावल्याचा आरोप केला जात होता, त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांची जयंती असल्याने मला तुमच्याशी बोलायचय काही निर्णय घ्यायचे, अशी भावनिक साद घालत गोपीनाथगडावर, या असे आवाहन पंकजा मुंडे यांनी  केले होते .

विशेष म्हणजे त्यांच्या ट्विटरवरून भाजपचे चिन्ह कमळ गायब झाल्याने त्या पक्ष सोडणार , शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सुरू झाल्या. काल दिवसभर राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू होती त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे भाजप सोडणार नाही असा खुलासा करायला सुरुवात केली होती.

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडेच काय पण महाराष्ट्रातील बडे नेते आमच्या संपर्कात असल्याचे विधान करत पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाला हवा देण्याचे काम केले. हे कमी की काय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंकजा मुंडे यांच्या ट्विटला उत्तर देताना गोपीनाथ मुंडे यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवू असे म्हटले. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे शिवसेना प्रवेशाची घोषणा करतात की काय, अशा चर्चाही सुरू झाल्या.

दरम्यान ,पंकजा मुंडे यांच्या या दबावतंत्रची दखल भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतल्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून भारताचे पहिले राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. विशेष म्हणजे काल पंकजा यांच्या ट्विटरवरून पाठवण्यात आलेले भाजपचे कमळ हे चिन्ह फेसबुक वर मात्र कायम दिसले त्यामुळे पंकजा यांनी आपल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख