Pankaja Munde says she doesn't go back on commitment | Sarkarnama

पंकजा मुंडे म्हणाल्या, मैने एक बार कमीटमेंट कर दी तो....

दत्ता देशमुख 
रविवार, 10 मार्च 2019

पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू होताच भाजप आमदार लक्ष्मण पवार समर्थकांनी पवारांची उमेदवारी जाहीर करा अशा घोषणा द्यायला सुरू केल्या. त्यावर, पंकजा मुंडे हसत हसत म्हणाल्या ,  एवढे वेडे लोक जगात सापडणार नाहीत. तुम्ही  शंका घेऊ नका, एक बार मैने कमिटमेंट कर दि तो, मै खुद की भी नही सुनती ." मुंडेंनी हा डायलॉग सांगून सर्व शंकांना पूर्ण विराम दिला.

गेवराई (जि. बीड) : पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू होताच भाजप आमदार लक्ष्मण पवार समर्थकांनी पवारांची उमेदवारी जाहीर करा अशा घोषणा द्यायला सुरू केल्या. त्यावर, पंकजा मुंडे हसत हसत म्हणाल्या ,  एवढे वेडे लोक जगात सापडणार नाहीत. तुम्ही  शंका घेऊ नका, एक बार मैने कमिटमेंट कर दि तो, मै खुद की भी नही सुनती ' . पंकजा मुंडे यांचा हा डायलॉग ऐकून आमदार लक्ष्मण पवार यांचा जीव भांड्यात पडला . 

गेवराई येथे शनिवारी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमास  पंकजा मुंडे उपस्थित होत्या .  त्यावेळी  ही घटना घडली . पंकजा मुंडे आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्यात मधल्या काळात अविश्वासाचे वातावरण होते .   शिवसेनेचे गेवराईचे माजी आमदार बदमराव पंडित यांनी पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क वाढविला होता तर लक्ष्मण पवार हातभर अंतर राखून होते . मग पंकजा मुंडे यांच्याकडून बदामरावांना  झुकते माप दिले जाऊ लागले . 

 लक्ष्मण पवार यांनीही मुंडेंचे विरोधक विनायक मेटे यांच्याशी संपर्क वाढविला होता . मेटें यांच्या  सोबतीने त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाठीभेटी देखील घेतल्या. त्यामुळे गेवराईची जागा शिवसेनेला सोडून पवार यांची अडचण निर्माण करण्याची खेळी होऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, मागच्या आठवड्यात लक्ष्मण पवार थेट पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी दिसले. तसेच गेवराईतील विजय संकल्प फेरीत खासदार प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. त्यामुळे दोघांत दिलजमाई झाल्याचे चित्र होते.  

या पार्श्वभूमीवर पंकजा  मुंडे  बऱ्याच दिवसांनी गेवराईला जाहीर  कार्यक्रमाला आल्या होत्या . गेवराई येथे शनिवारी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात पंकजा मुंडे भाषणासाठी उठताच आमदार लक्ष्मण पवार समर्थकांनी ‘जाहीर करा, जाहीर करा अण्णांची उमेदवारी जाहीर करा’ अशा घोषणा दिल्या. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या , "एवढे येडे लोक जगात सापडले नाहीत.  तुमच्या चांगल्या  नेत्याचे वाटोळे करू नका, पायावर धोंडा पडून घेऊ नका . मला बप्पासाहेब पवार यांची आठवण येते . ते हिंदी डायलॉग मारायचे . मी त्यांना सिंघम म्हणायची .  तुमच्या मनात शंका तुमच्या आमदारानेच उठवली , मी नाही . मी तर तेंव्हाही आले , लक्ष्मण पवारांच्या घरी गेले आणि माझे पक्षाबाहेर संबंध राखणे आणि माझ्या  पक्षाचा एकेक आमदार निवडून आणणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत . एवढी परिपक्वता माझ्यात आहे तुमच्यातही ती  आली पाहिजे .  लक्ष्मण अण्णावर  ऍट्रॉसिटी झाल्यानंतर  पालकमंत्री असूनही मी पंकजा मुंडे तुमच्या आंदोलनात सहभागी झाले होते   ."

"  ज्यांनी मला एवढा त्रास दिला त्यांचे नाव आमचे नेते गडकरी साहेबानी घेतले . मी त्यांना म्हंटले का त्या नेत्याचे नाव घेऊ नका ?   त्यांनी तुमच्या घरी येऊन सत्कार घेऊन   (विनायक मेटे मधल्या काळात त्यांच्या घरी गेले होते) काड्या करून शंका निर्माण केली आहे.  शंका माझ्या  मनात नाही तुमच्या मनात आहे. माझ्या भूमिकेत कुठेही शंका नाही आणि भाजप -शिव सेनेची युती राज्यभर आहे . तुम्हाला काय करायचे आहे ? तुम्ही अशा शंका घेऊन आपल्या चांगल्या नेतृत्वाच्या पायावर धोंडा पडून घेऊ नका एवढेच सांगते   ". असे म्हणत पंकजा मुंडेंनी आगामी निवडणुकीत लक्ष्मण पवार हेच येथून उमेदवार असतील हे स्पष्ट करत  कार्यकर्त्यांची कानउघडणीही केली . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख