भाजपची कोअर कमिटी सोडल्याची पंकजा मुंडेची घोषणा

गोपीनाथ मुंडेच्या रक्तात बेईमानी नाही. पक्ष कोणा एकाचा नसतो, ती सतत बदलणारी प्रकिया आहे. तो कोणा एकाचा नाही. पक्ष रिव्हर्स गिअर मध्ये नेऊ नका असे सांगत मी पक्ष सोडणार नाही, पक्षाने मला सोडावे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Pankaja Munde BJP Leader Say I am Out of Core Committee
Pankaja Munde BJP Leader Say I am Out of Core Committee

परळी (जि. बीड) : बंड केले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून सर्व महाराष्ट्र भर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत, मी कोअर कमिटीतून मुक्त होत आहे, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.

परसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अभिवादन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, अतुल सावे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, रमेश आडसकर, रमेश पाकळे, सविता गोल्हार आदींची उपस्थिती होती.

पराभवानंतर तब्बल दीड महिन्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या पंकजा मुंडे काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली बेधडक भूमिका आणि भावना व्यक्त केल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, ''मी कुठेही जावून काहीही होवू शकते. पण तसे करणार नाही. मी एक समाजातील एक घटक आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंना निधनानंतरही लोक आदराने बोलतात. त्या मर्दाची मी मुलगी आहे. पराभवाने खचणारी पंकजा मुंडे नाही. माझी जनतेशी जोडलेली नाळ कोणी तोडणार नाही.'' १२ दिवस संजय राऊत यांच्या नंतर मीच टिव्हीवर असल्याची किमया मुंडेंची असल्याचेही त्यांनी नमूद केले. माझा आवाज दाबू नका असे आवाहन करत देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी शपथ घेतली तेंव्हा सुत्र कुठे होते, असा सवालही त्यांनी केला. 

झोपेतून डोळे चोळत उठल्यानंतरच कळाले यांनी शपथ घेतली. गोपीनाथ मुंडेंनी भाजपमध्ये शेवटचा श्वास घेतला. आपण घरच्या भाकरी बांधून संघर्ष यात्रा काढली, पक्षाकडून दमडीही घेतली नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झालेला असतानाही आपण तेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी एकेक आमदार निवडून आणण्यासाठी काम केले. मग मी बंड का करणार असा सवाल करत ह्या वावड्या उठविल्या जात असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

आपण शेवटच्या क्षणापर्यंत काम केले. प्रथम देश, नंतर पक्ष व नंतर मी या तत्वाने जगले. पडल्यावर पण पक्ष सोडणार अशा अफवा कोणी सोडल्या याची चौकशी करा, असे आवाहन त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केले. याचे उत्तरही पक्षाने द्यावे असे आवाहन करत आपण आमदार, विरोधी पक्षनेते होण्यासाठी मी दबाव आणला असे म्हणणे चुकीचे आहे. गोपीनाथ मुंडेच्या रक्तात बेईमानी नाही. पक्ष कोणा एकाचा नसतो, सतत बदलणारी प्रकिया आहे. पक्ष रिव्हर्स गिअर मध्ये नेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. आपण कोर कमिटीच्या जबाबदारीतुन आज मुक्त होत आहोत, मी आता कोणीच नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सत्ता असताना कार्यकर्ते सांभाळायची आवश्यकता नाही. आता ताकद द्यावी लागेल, आता मी काम करणार असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. बंड केले नसते तर स्वातंत्र्य मिळाले नसते, मी बंडखोर आहे, स्वाभिमान दिवस आहे, पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे यासाठी एकनाथ खडसे यांच्यासह मशाल घेऊन राज्यभर फिरणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com