pankaja munde have three options | Sarkarnama

हे आहेत पंकजा मुंडे यांच्यासमोरचे तीन पर्याय!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 डिसेंबर 2019

बारा डिसेंबर रोजी पंकजा पुढील वाटचाल स्पष्ट करणार....

पुणे : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत. त्यांचा परळी विधानसभा मतदार संघातून 30 हजारांवर मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर त्या संधीची वाट पाहत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरून आपला भाजपशी असलेला संबंध तोडून टाकला आहे. प्रंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेली कव्हर इमेजही काढून टाकली आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या विरोधात रणशिंग फुंकणार, अशी चर्चा सुरू झाली. 

विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. मात्र ज्यांच्यामुळे हा पऱाभव झाला त्यांना त्या माफ करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठीच त्यांनी आता गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी समर्थकांशी संवाद साधण्याचे जाहीर करत आपल्या विरोधकांना आव्हान दिले आहे.

राज्यात भाजपचे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गेल्यानंतर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आता मजबूत झाले आहेत. एकनाथ खडसे त्यामुळे उघडपणे फडणवीस यांच्या कार्यशैलीवर टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी युती करून सरकार स्थापन करण्याचा फडणवीस यांचा बेत धुळीस गेला असला तरी अशा युतीमुळे भाजपमधील जनाधार असलेले नेते चिडले आहेत. ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांनाच फडणवीस पायघड्या अंथरत असल्याचे चित्र या विरोधकांच्या मनात तयार झाले.

पंकजा या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्याप त्या जिल्ह्यात आणि सार्वजनिक कार्यक्रमात आल्या नव्हत्या. मात्र, आता त्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त येत आहेत. समर्थकांना आवाहन करणारी आणि उपस्थितीबद्दल विश्वास व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवरुन लिहली आहे. भविष्यातील वाटचालीचा निर्णयही यावेळी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पंकजा मुंडे यांच्यासमोर काय पर्याय असू शकतात

1)त्या शिवसेनेत जाऊ शकतात. त्यांना भाजपच्या काही आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांना त्या भाजपमधून आणू शकतात.

2)भाजपमध्येच राहून विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात आणि तेथे विरोधी पक्षनेत्या बनू शकतात.

3)भाजपच्या प्रदेशाध्यक्ष त्या बनू शकतात. 

त्यामुळे त्यांची बारा डिसेंबरची खेळी मोठा राजकीय दबाव टाकण्याची सुरवात असू शकते. पंकजा यांचा पराभव त्यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी केला. मात्र विजयाचे श्रेय एकट्या धनंजय यांना देण्यास पंकजांचे समर्थक तयार नाहीत. यामागे पक्षातीलच काही मंडळींचा हात असल्याचा त्यांचा दावा आहे. पंकजा यांच्यासाठी पक्ष विधान परिषदेचेही दरवाजे सहजपणे खुले करण्याचे संकेत मिळत नाहीत. त्यामुळे तेथे तरी संधी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न असू शकतो. विधान परिषदेत भाजपकडे आक्रमक चेहरा नाही. तो चेहरा पंकजा होऊ शकतात. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे राज्यभर फिरले. त्याचा त्यांना उपयोग झाला. त्या पदाचेही आकर्षण पंकजा यांना असू शकते.

चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावरून लवकरच जाणार आहेत. त्यांच्याऐवजी राम शिंदे किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांचाही विधानसभेत पराभव झाला. बावनकुळे यांना तिकिटही मिळू शकले नाही. मात्र त्यामुळे तेली समाजाच्या नाराजीचा मोठा फटका भाजपला बसला.  त्यांचे पुनर्वसन करण्याचे आणि त्यातून ओबीसी व्होटबॅंक पुन्हा मजबूत करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र राज्यात ओबीसी चेहरा म्हणून ओळख असलेल्या पंकजा यांचा त्या नावासाठी विचारही होऊ नये, ही बाब त्यांच्या समर्थकांना खटकत आहे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे स्वागत पंकजा यांनी केले होते. ठाकरे यांनीही मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले होते. पंकजा यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे नेहमीच खुले असतील. मात्र भाजपचा त्याग करण्याचा धोका पंकजा आताच घेतील का, याची शंका वाटते. तसेच भाजपमधील आमदार फोडणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे त्या पक्षात राहूनच आपले महत्त्व वाढविण्याचा कमाल प्रयत्न करतील. याचीच शक्यता सर्वाधिक आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख