जुन्या सरकारच्या योजना बंद करण्यातच महाविकास आघाडी बिझी : पंकजा मुंडे

सामान्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले तर कौतुक करु, पाठीशीही राहू, वाईट केले तर पाठीत धपाटा मारु. बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे वळला हे दुर्दैव असल्याचे सांगत जिल्ह्याची मान खाली जाईल असं काम कोणत्याही नेत्याने करू नये अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी स्थानिक विरोधकांवर केली.
 जुन्या सरकारच्या योजना बंद करण्यातच महाविकास आघाडी बिझी : पंकजा मुंडे

बीड : सामान्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले तर कौतुकच करु. मात्र, निर्णय घेण्याऐवजी महाविकास आघाडी जुन्या सरकारचे निर्णय रद्द करण्यातच बिझी असल्याचा टोला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, जनतेतून सरपंचांची निवड रद्द करु नये अशी मागणीही त्यांनी केली. भाजपचे नुतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या "संघर्षयोद्धा' या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन शुक्रवारी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. 

यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आदिनाथ नवले, केशव आंधळे, अक्षय मुंदडा, रमेश पोकळे उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्यातल्या विरोधकांना आपण कधी त्रास दिला नाही. जाती - पातीच्या राजकारणाला थारा देवू नका, पराभवातून आपण खचून जाणारे नाहीत, गोपीनाथराव मुंडेंनी संघर्ष करायला शिकविले आहे. संघर्ष या भूमीचा गुण असून आपण संघर्ष करत राहणार आहोत. मराठवाड्याचा पाणी प्रश्‍नाबाबतची भूमिका तत्वाची असून त्यासाठी सर्वांना सोबत घेवू. 

बीड जिल्हा पुन्हा गुंडागिरीकडे वळू लागला हे दुर्दैव असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मागच्या पाच वर्षांत जिल्ह्याचं नाव फार मोठं झालं. मुलींची संख्या वाढली, विकासाची कामे झाली, पीक विम्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. गुंडगिरीचा सामान्यांना त्रास होत आहे. सरकार, पालकमंत्री येतात - जातात पण सामान्यांना त्रास होऊ नये. सामान्यांचा त्रास खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

महाविकास आघाडीचे सरकार जुन्या सरकारच्या योजना बंद करण्यात बिझी आहे. अद्याप निर्णय घेत नाही. जर घेतलेला निर्णय आवडला नाही तर रस्त्यावर उतरू. मात्र युती सरकारने घेतलेले शिक्षक बदली, जनतेतून सरपंच निवड, हे सामन्य माणसाच्या हिताचे निर्णय रद्द करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, सविता गोल्हार, जयश्री मस्के, मोहन जगताप, स्वरुपसिंह हजारी, नवनाथ शिराळे, भारत काळे, विजयकांत मुंडे, अशोक लोढा, सुलोचना वाव्हळ, स्वप्नील गलधर, जगदीश गुरखुदे, राजेंद्र बांगर, सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, अजय सवाई, सलीम जहांगिर, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com