पंकजा मुंडे यांच्या उपोषणाकडे संभाजी पाटील निलंगेकर फिरकलेच नाही

 पंकजा मुंडे यांच्या उपोषणाकडे संभाजी पाटील निलंगेकर फिरकलेच नाही

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नासह इतर मागण्यांसाठी भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत केलल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील कोणते आमदार, पदाधिकारी उपस्थित राहतात यावरही सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. फडणवीस सरकारमध्ये राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची अनुपस्थिती मात्र चांगलीच खटकली. 

मराठवाड्याच्या प्रश्‍नावरील उपोषणाला भाजपमधील अनेक आजी-माजी आमदार उपस्थित हजर असतांना लातूरचे पालकमंत्री म्हणून काम केलेले संभाजी पाटील निलंगेकर मात्र पंकजा मुंडे यांच्या उपोषणाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. संभाजी पाटील निलंगेकर हे मुंबईला गेले असल्याचे सांगितले जाते. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

मराठवाड्यातील राजकारणात पंकजा मुंडे आणि संभाजी पाटील निलंगकेर ही दोन महत्वाची नावे म्हणून ओळखली जातात. राज्यात फडणवीस सरकार असतांना पंकजा मुंडे यांनी काही काळ लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील काम केले होते. परंतु या काळात निलंगेकर-मुंडे यांच्यात फारसे सख्य दिसून आले नव्हते. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या व राज्याच्या ग्रामविकास-महिला बालकल्याण मंत्री असल्यामुळे त्या लातूर जिल्ह्याला फारसा वेळ देऊ शकत नाही अशी टीका त्यावेळी निलंगेकर समर्थकांकडून केली जात होती. 

विशेष म्हणजे या टिकेनंतरच पंकजा मुंडे यांच्याकडील पालकमंत्रीपद काढून ते संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदेत एकापाठोपाठ एक असे विजय मिळवत निलंगेकरांनी आपली ताकद दाखवून दिली होती. मराठवाड्यातील राजकारणात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि कॉंग्रेसचे विलासराव देशमुख यांच्यातील मैत्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली. पण पंकजा मुंडे आणि संभाजी पाटील निलंगेकर या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये मात्र फारसे सख्य दिसले नाही. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर पहिलेच मोठे आंदोलन मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतून लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून सुरू केले. केंद्र आणि राज्यातील बड्या नेत्यांनी या उपोषणाला हजेरी लावून पंकजा मुंडे यांना पाठिंबा दर्शवला. अशावेळी पंकजा मुंडे यांच्या शेजारी जिल्ह्यातील स्वपक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनीच उपोषणाकडे पाठ फिरवल्याने इथे नव्या वादाला तोंड फुटू शकते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com