वाघिणीच्या गर्जनेकडे राज्याचे लक्ष ...

जमाव आक्रमक होऊन हिंसक होतोय अशी वेळ आली, वडिलांचे निधन, सारे घर शोकाकूल, दुःखाचा अवाढव्य डोंगर अंगावर कोसळलेला असताना गोपीनाथरावांची ही वाघिण गर्दीसमोर आली आणि गोपीनाथरावांची शपथ घालून समयसूचकता दाखवून साऱ्या जमावाला केवळ दोन मिनिटात शांत केले. ज्या धीरोदत्तपणे त्यांनी तो प्रसंग हाताळला त्यातून त्यांचे नेतृत्व तर सिद्धच झाले पण समाजमान्यतेची मोहोर उठवणारे ठरले.
वाघिणीच्या गर्जनेकडे राज्याचे लक्ष ...

पुणे : वडिलांचा भक्कम राजकीय वारसा मिळणे ही जशी जमेची बाजू असते तशी सतत त्यांच्याशी तुलना होत असल्याने काहीवेळा ती तोट्याचीही ठरते. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अशी बरीच उदाहरणे आहेत. मात्र राज्याच्या राजकीय क्षितीजावर तळपत असताना सतत चर्चेचा विषय ठरलेल्या आणि आज साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेल्या नेत्या म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे. 

एकेकाळी व्यक्तीला महत्वाचे न मानणाऱ्या भाजपसारख्या पक्षात नेत्या म्हणून त्यांचे नाव इतके मोठे व्हावे यातच त्यांचे मोठेपण लक्षात यावे. गोपीनाथराव हयात असताना म्हणजे 2009 मध्ये पंकजा मुंडेंचा राजकारणात आमदार म्हणून प्रवेश झाला. तोपर्यत त्या वडिलांच्या सावलीत होत्या. त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षातूनच झाली. त्यांचा संघर्ष त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याशीच झाला आणि होतोय. गोपीनाथरावांशी मतभेद झालेले धनंजय थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले आणि मग पंकजा मुंडे फ्रंटला येऊन लढायला लागल्या. 

संघर्ष हा गोपीनाथरावांच्या नशिबी कायमच होता आणि तोच काट्याकुट्याचा रस्ता पंकजा यांच्या नशीबी वारसा हक्काने आला आहे. वडिलांनी जशी संघर्ष यात्रा काढली होती तशीच यात्रा पंकजा मुंडे यांनीही काढली होती. 2014 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले पण महत्वाचे खाते मिळाले नाही . त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्यातील कागदाला पाय फुटले आणि त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले . मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्‍लीन चीट दिली खरी पण या आरोपांनी पंकजा मुंडेंच्या घोडदौडीला लगाम लागला . 

गोपीनाथ मुंडे यांची लोकप्रियता पंकजा मुंडे यांना मिळाली. त्याचबरोबर त्यांच्या अनुयायांची भक्कम साथही त्यांना सतत मिळाली. लोकसंग्रह आणि बांधिलकी लोकांशी हा गोपीनाथरावांचा श्‍वास होता तोही वारसा पंकजाताईंकडे चालत आला तो त्यांनी जपला आणि वाढवलाही. गोपीनाथरांवाच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जमलेली लाखोंची गर्दी भावनाकल्लोळात हरवून नको त्या पद्धतीने आक्रमक होत होती. जमाव आक्रमक होऊन हिंसक होतोय अशी वेळ आली, वडिलांचे निधन, सारे घर शोकाकूल, दुःखाचा अवाढव्य डोंगर अंगावर कोसळलेला असताना गोपीनाथरावांची ही वाघिण गर्दीसमोर आली आणि गोपीनाथरावांची शपथ घालून समयसूचकता दाखवून साऱ्या जमावाला केवळ दोन मिनिटात शांत केले. ज्या धीरोदत्तपणे त्यांनी तो प्रसंग हाताळला त्यातून त्यांचे नेतृत्व तर सिद्धच झाले पण समाजमान्यतेची मोहोर उठवणारे ठरले. 

भाजपच्या पाच वर्षाच्या सत्ता काळात त्यांना पक्षांतर्गत साथ म्हणावी तशी मिळाली नाही आणि पक्षातील धुरीणांकडून तसेच काही नेत्यांकडून कोंडी करायचे प्रयत्न झाले. जो गड गोपीनाथ मुंडेंनी आपला मानला, वाढवला त्या भगवानगडावरच त्यांना कार्यक्रम करण्यासाठी बंदी घातली गेली. मात्र तिथेही त्यांनी गडाच्या पदाधिकाऱ्यांचा मान राखत समन्वयाने मार्ग काढत भगवानबाबांच्या जन्मगावी दुसऱ्या गडाची निर्मिती केली, त्यानंतर वडिलाचे यथोचित स्मारक उभे करत आपल्या कार्यकर्त्यांना नेमकेपणाने आपल्याशी जोडून ठेवले. 

पंकजा मुंडे यांच्यासमोर आज आव्हाने अनेक आहेत. मागच्या सरकारने दिलेले पॅकेज नव्या सरकारने रद्द केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा साखर कारखाना अडचणीत आहे. त्यांना शिवसेनेत जायचा मार्ग खुला आहे किंवा अराजकीय संघटना काढून नवा दबावगट निर्माण करायचा मार्ग खुला आहे. 

मात्र पक्षात राहून संघर्ष करायचा की सगळी कारकीर्दच पणाला लावणारा निर्णय घेऊन धक्कातंत्राचा वापर करून राजकारणाची नवी इंनिग सुरू करायची याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. पंकजा मुंडे यांच्या दोन बहिणी भाजपच्या खासदार आहेत. एक सख्खी बहिण प्रीतम तर दुसरी मामेबहिण पुनम महाजन. त्यामुळे आपल्या निर्णयाचे परिणाम आपल्या भगिनींवरही होणार हे त्या जाणून आहेत . 

राजकारणाचा पोत आणि बाज 2014 नंतर खूपच बदलला. मोदी पर्वात सगळी गणितेच बदलली पण ज्याचे पाय जमिनीशी घट्ट आहेत आणि ज्यांना जनाधार आहे त्यांना अडथळे येतात पण यश येतच नाही असे होत नाही, फक्त युद्धाचे नियम आणि जागा बदलली की शस्त्र आणि पद्धत बदलावी लागते. यात पंकजा मुंडे हुशार आहेत आजपर्यंत त्यांनी वाटेत आलेल्या अडचणींच्या काट्याचेच भाले करून विरोधकांना पराभूत केले आहे. उद्याच्या जयंतीदिनी त्या कुठला निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातल्या अनेकांचे लक्ष आहे, मग त्यात कै. गोपीनाथरावांचे समर्थक आणि त्यांचे विरोधक तसेच हितचिंतक या सगळ्यांचाच समावेश आहे. कारण प्रश्‍न एका वाघिणीच्या अस्तित्वाच्या लढ्याचा आणि तिच्यामुळे बदलत जाणाऱ्या समीकरणांचा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com