pankaja munde and dasara melava | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

सावरगावच्या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंच्या नव्या पर्वाला सुरुवात

दत्ता देशमुख
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरील भाषणाच्या विरोधामागे शह-काट शहाचे राजकारण असल्याचा समर्थकांचा आरोप आहे. यंदा गडावरील भाषणाचा मुद्दा तापल्यानंतर भाषण होऊ नये यासाठी विरोधकांनी त्यांच्या मार्गावर काटे अंथरले.

बीड : महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांची "माहेरच्या लेकीला भगवान गडावर वीस मिनिटे द्या' ही विनंती फेटाळली. त्यानंतर वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या परंपरेचे सीमोल्लंघन करत पंकजा यांनी भगवान बाबाचे जन्मस्थान असलेल्या पाटोदा तालुक्‍यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडला. या निमित्ताने पंकजा मुंडे यांच्या राजकीय पर्वाला नव्याने सुरुवात झाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. 

संत भगवान बाबा हे वंचित आणि उपेक्षीत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जातात. समाजातील उपेक्षित आणि वंचित समाजासाठी त्याग आणि अपेष्ठा सहन कराव्या लागणाऱ्या संत भगवान बाबांनी समाजाला शिक्षणाचे दरवाजे खुले करुन मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे बाबा समाजाचे सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान ठरले. पुढे त्यांचा वारसा दिवंगत मुंडेंनी चालवला. भगवान बाबा यांच्यानंतर समाजाने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना सर्वाधिक प्रेम आणि पाठबळ दिले. बाबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांची कर्मभूमी असलेल्या भगवान गडावरुनच गोपीनाथ मुंडे यांनी समाजाची वज्रमुठ आणि ताकद महाराष्ट्राला दाखवून दिली. 

भगवान बाबांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याला दिवंगत मुंडेंनी नव्या उंचीवर नेले. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्‍चात हे कार्य त्यांच्या कन्या पंकजा पुढे नेऊ इच्छितात. पण त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. भगवान गडावरून राजकीय भाषण नको या भूमिकेतून महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा यांना विरोध केला. त्यामुळे गेल्यावर्षी गडाऐवजी पायथ्याशी मेळावा पार पडला. यंदाच्या दसरा मेळाव्यावर देखील अनिश्‍चिततेचे सावट होते. माहेरच्या लेकीचा दाखला देऊन दरवर्षी गडावर समाजासाठी वीस मिनिटे द्या ही आर्त हाक देखील महंतानी ऐकली नाही. एकीकडे समाज आणि दुसरीकडे गड अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या पंकजा मुंडे यांनी अखेर त्यावर मार्ग शोधलाच. भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगावातून आता पंकजा मुंडे विचारांचे सोने समाजाला देणार आहेत. 
कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावते.. 
"कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावते, जन्मस्थळाची माती माथी लाऊन नवा अध्याय सुरु करतेय' असे ट्‌विटद्वारे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. गडाच्या आसपास वंजारा समाज मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. त्यामुळे आपले मन मोकळे करण्यासाठी पंकजा यांनी भगवान बाबांच्या जन्मस्थळाची निवड केल्याचे बोलले जाते. सावरगावच्या दसरा मेळाव्यातून त्या समाजाला कोणती दिशा देतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. "केवळ दिवंगत मुंडेंच्या पुण्याईमुळेच पंकजा' असे हिणवणाऱ्यांना पुन्हा एकदा कर्तृत्व सिध्द करत सडेतोड उत्तर देण्याची संधी या निमित्ताने पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. 
काटेरी मार्गातला डाव यशस्वी 
पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरील भाषणाच्या विरोधामागे शह-काट शहाचे राजकारण असल्याचा समर्थकांचा आरोप आहे. यंदा गडावरील भाषणाचा मुद्दा तापल्यानंतर भाषण होऊ नये यासाठी विरोधकांनी त्यांच्या मार्गावर काटे अंथरले. एकीकडे त्यांचे मानलेले बंधू मंत्री महादेव जानकर पंकजा मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते, तर दुसरीकडे पंकजा यांचे भाऊ म्हणवून घेणारे मंत्री राम शिंदे यांनी मात्र गडावरील मेळाव्यात अडथळे निर्माण केले. पण, जन्मभूमीचा मार्ग निवडत पंकजा मुंडेंनी विरोधकांना एक प्रकारे शह दिल्याचे बोलले जाते. गडाच्या पायथ्याला मेळावा घेणे त्यांच्यासाठी अपमानास्पद तर होतेच शिवाय मेळावा झालाच असता आणि त्यातून काही अनुचित प्रकार घडला असता तर त्याची राजकीय किंमत पंकजा मुंडेंना चुकवावी लागली असती. त्यामुळे नवा मार्ग शोधण्याची त्यांची खेळी यशस्वी ठरली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख