पंकजा मुंडे यांचा 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद, नव्या भूमिकेबद्दल उत्सुकता

राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्‍यकता आहे असेही पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.
 पंकजा मुंडे यांचा 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद, नव्या भूमिकेबद्दल उत्सुकता

बीड : परळीतून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रथमच ता. 12 डिसेंबरला दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक कार्यक्रमात येत आहेत. 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू असे आवाहन करत येणार ना मग तुम्ही सर्व ? मावळे येतील हे नक्की असा विश्वासही आपल्या फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी व्यक्त केला आहे. 

पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदार संघातून 30 हजारांवर मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला आणि त्याची जबाबदारीही स्वत:वर घेतली. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्याप त्या जिल्ह्यात आणि सार्वजनिक कार्यक्रमात आल्या नव्हत्या. मात्र, आता त्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त येत आहेत. समर्थकांना आवाहन करणारी आणि उपस्थितीबद्दल विश्वास व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवरुन लिहली आहे. भविष्यातील वाटचालीचा निर्णयही यावेळी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सत्तेत असताना गोपीनाथगडावरील दिवंगत मुंडेंच्या जयंती कार्यक्रमांना भाजपसह इतर पक्षांच्या दिग्गजांची हजेरी असे. आता कोणी येणार का एकट्या पंकजा मुंडेच समर्थकांशी संवाद साधणार याकडेही लक्ष आहे. आपल्या आवाहनात त्या म्हणतात " नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकालही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होतो. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे. दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. "आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले. 

त्या पुढे म्हणतात, पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली. मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझी कवचकुंडल आहेत. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्‍चात जनतेप्रती असलेल्या जवाबदारीतून राजकारणात राहिले, आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्‍यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे... 
येत्या आठ ते दहा दिवसांनंतर...हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं ? कोणत्या मार्गाने जायचं ? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो ? आपली शक्ती काय ? लोकांची अपेक्षा काय ? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबररोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुमच्याशी बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्याविषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद साधायची उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी ? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !! येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com