भाजपच्या औरंगाबादमधील विभागीय बैठकीकडे पंकजा मुंडेनी फिरवली पाठ ...

 भाजपच्या औरंगाबादमधील विभागीय बैठकीकडे पंकजा मुंडेनी फिरवली पाठ ...

औरंगाबाद : संघटनात्मक निवडणुका आणि भविष्यात भाजपची मराठवाड्यातील वाटचाल ठरवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विभागीय बैठकीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली आहे. पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू असतांना महत्वाच्या बैठकीला असलेली त्यांची अनुपस्थिती बरीच बोलकी आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र पंकजा मुंडे आजारी असून आपली परवानगी घेऊनच त्या बैठकीला आल्या नसल्याची सावरासावर केली आहे. 

औरंगाबादेत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागाची महत्वपुर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत लवकरच घेण्यात येणाऱ्या संघटनात्मक निवडणुका, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका, राज्यात स्थापन झालेले महाआघाडीचे सरकार या सर्वच विषयावर चर्चा झाली. परंतु पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या बैठकीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र पाठ फिरवली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. 

भाजपमधील ओबीसी नेत्यांमध्ये खदखद असल्याची चर्चा असतांनाच एकनाथ खडसे दिल्लीला गेले आहेत, तर पंकजा मुंडे यांनी पक्षाची बैठक टाळली. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपमधील ओबीसी नेत्यांच्या चर्चेला बळ मिळाल्याचे बोलले जाते. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरी बद्दल चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे या आजारी आहेत, शिवाय 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांची जयंती आणि त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीत त्या व्यस्त असल्याचे पाटील यांनी सांगितले. एकंदरीत पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या बैठकी ऐवजी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाला प्राधान्य दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com