पंकजा मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न की पाण्याचा?

गोपीनाथ गडावरून पक्षातील स्वकीयांवर हल्ला चढवत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आजच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून केला.
pankaja munde agitation analysis
pankaja munde agitation analysis

औरंगाबादः गोपीनाथ गडावरून पक्षातील स्वकीयांवर हल्ला चढवत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आजच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून केला. 

मराठवाड्यातील भाजपचे बहुतांश आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावल्याने पंकजा मुंडे यांच्या शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल.

परळी विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर काहीकाळ राजकारण आणि समर्थकांपासून दूर गेलेल्या पंकजा मुंडे यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावरून जोरदार कमबॅक केले. 

भाजपमधील असंतुष्टाचा गोतावळा जमवत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच पंकजा यांनी पक्षाला खडेबोल सुनावले होते. भाजप कोअर कमिटीतील सदस्यपद सोडत गोपीनाथ मुंडे यांचे मुंबईतील कार्यालय सुरू करून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून भविष्यातील वाटचाल करण्याची घोषणा राणाभीमदेवी थाटात पंकजा यांनी 12 डिसेंबर रोजी केली होती.

त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी पंकजा मुंडे औरंगाबादेतील एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून आले. मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्‍नासह दहा मागण्यांसाठी आपले हे उपोषण असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमधील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जरी आपल्याकडे दुर्लक्ष केले असले, तरी मराठवाड्यातील किती आमदार, पदाधिकारी, नेते आपल्या पाठीशी आहेत हे या निमित्ताने पंकजा यांनी तपासले.

उपोषणाला समर्थकांची जमलेली गर्दी, पक्षाच्या आमदारांची उपस्थिती आणि पदाधिकारी, नेत्यांची रेलचेल पंकजा यांना समाधान देणारी ठरली. 12 डिसेंबरच्या गोपीनाथ मुंडे गडावरील मेळाव्यापासून अंतर राखून असलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांनी मात्र आज हजेरी लावली.

परळीतील पराभवाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातभार लागला असा आरोप पंकजा समर्थकांकडून केला जातो. पंकजा मुंडे यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेण्याचे टाळले असले तरी त्यांचे ही हेच मत झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पकंजा यांच्या उपोषणाला फडणवीस येणार की नाही? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते.

राजकीय परिस्थीती आणि गांभीर्य ओळखून फडणवीस यांनी देखील उपोषणाला हजेरी लावून आपल्या विरोधात मुंडे समर्थकांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला. परंतु व्यासपीठवरील फडणवीस यांचा वावर, भाषण केल्यानंतर पंकजा यांच्याशी न बोलता निघून जाणे यातून या दोघांमधील वाद अजून संपलेला नाही हे दर्शवत होते.

उद्धव ठाकरेंबद्दल सॉफ्टकॉर्नर..
राज्यातील महाविकास आघाडीवर टिका न करण्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतलेली आहे. ती आजही कायम होती. एकीकडे भाजपचे नेते, स्वःत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवत असतांना पंकजा मुंडे यांनी मात्र नेमकी त्या विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे पंकजा यांनी आपला दुसरा पर्याय अजूनही आपल्यासाठी खुला ठेवल्याची चर्चा आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. हीच परंपरा राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांनी पुढे सुरू ठेवली आहे. उध्दव ठाकरेंकडून तर पंकजा यांचा माझ्या भगिनी असा वारंवार उल्लेख केला जातो. गोपीनाथ गडावरील मेळाव्यात स्वपक्षातील नेत्यांवर हल्ला चढवत असतांना पंकजा मुंडे यांनी तेव्हा देखील उध्दव ठाकरे यांचा माझे भाऊ असा उल्लेख केला होता.

सरकार सत्तेवर येऊन जेमतेम शंभर दिवस पुर्ण झालेले असताना, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वःत संवेदनशील असतांना त्यांना वेळ देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आपण सरकारवर टिका करणार नाही ही पंकजा मुंडे यांची भूमिका बरीच बोलकी वाटते. पक्षातील अतंर्गत शत्रूंना रोखण्यासाठीच पंकजा मुंडे यांच्याकडून उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मवाळ धोरण स्वीकारण्यात आल्याचे दिसते.

मंत्रालयातील पाटीवर माझे नाव नाही, माझ्याकडे सत्ता किंवा पद नाही याचे मला दुःख नाही, तुमच्या मनातले स्थानच माझ्यासाठी सर्वोच्च आहे. ते नसेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाला देखील किमंत नाही असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना भावनिक साद घातली. पंकजा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत त्याला प्रतिसादही मिळाला.

भविष्यात पक्षातील कुठलेही मोठे पद, सत्ता नसतांना कायकर्ते, समर्थकांना कायम आपल्या पाठीशी ठेवण्याचे मोठे आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर असणार आहे. बीड जिल्ह्याचा विचार केला तर पंकजा यांचे चुलत बंधू राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करत मुंडे भगिनींचे खच्चीकरण करण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतून याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांसह जिल्ह्यात आणि राज्यातील विरोधकांशी दोन हात करून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार हे मात्र निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com