जिल्हा परिषदेतील सत्तेमुळे पंकजा मुंडेंचे राजकीय वजन वाढले

 जिल्हा परिषदेतील सत्तेमुळे पंकजा मुंडेंचे राजकीय वजन वाढले

बीड : परळीसह जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर प्रश्‍न चिन्ह निर्माण करण्यात आले होते. परळीतील घरच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा यांच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याचे चित्र देखील विरोधकांकडून निर्माण करण्यात आले. परंतु या सगळ्या टीका व भविष्यवाणीवर मात करत पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतली. राष्ट्रवादीने पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे यांना हाताशी धरून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि जिल्हा परिषदेची सत्ता बळकावली होती. त्या पराभवाचे उट्टे पाच वर्षांनी पंकजा मुंडे यांनी काढल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषदेतील सत्तेमुळे राज्य पातळीवरील राजकारणात पंकजा यांचे वजन पुन्हा वाढल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे. 

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कारण इथे बहीण-भावामध्ये लढाई होती. नात विसरून या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप, पक्ष फोडाफोडी असे सगळेच प्रकार झाले. ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पंकजा करतात त्या परळी नगरपालिकेतच त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील त्या नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.त्यानंतर भगवान गडाच्या महंताशी पंकजा यांचा झालेला वाद, आरोप-प्रत्यारोप, गडाच्या पायथ्याशी सभा घेऊन समर्थकांना केलेले आवाहन या घटनांचा चांगला वाईट परिणाम त्यांच्या राजकारणावर देखील झाला. त्यानंतर जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नगरपालिकेतील अपयश धुवून काढण्याची संधी पंकजा मुुंडे यांना मिळाली. इथेही धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा असाच सामना रंगला. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेचा वाद निर्माण करत धनंजय मुंडे यांनी खळबळ उडवून देत भाजपवर पहिला हल्ला चढवला. राष्ट्रवादीने या मुद्याचा हत्यारा सारखा पुरेपूर वापर केला. पंकजा यांनी यावर आपल्या पद्धतीने उत्तर दिले, तेव्हा निवडणुका आल्या की भाजपकडून भावनिकतेचा मुद्दा पुढे केला जातो असा आरोपही झाला. 
युद्धात हरल्या, तहात जिंकल्या 
पंकजा मुंडे यांच्यासाठी जिल्हा परिषदेची लढाई सोपी नव्हती. एकीकडे पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान, तर दुसरीकडे भाऊ धनंजय व राष्ट्रवादी पक्ष. पंकजा, प्रीतम या दोन बहिणींनी जिल्हा पिंजून काढत मतदारांशी संपर्क साधला. जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची जंत्री मांडली आणि मते देण्याचे आवाहन केले. मतदान झाले, निकाल लागला आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिली. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकत जिल्हा परिषदेच्या सत्तेवर पुन्हा एकदा दावा केला. जिल्हा परिषदेच्या युद्धात पुन्हा एकदा पंकजा हरल्या होत्या. पण सत्ता आणायचीच या जिद्दीने त्यांनी राष्ट्रवादीतील असंतुष्टांना खेचण्याचा प्रयत्न केला. पूर्वाश्रमीचे भाजपमध्ये असलेले आणि आता नुकतेच राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबित झालेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस गळाला लागले. पत्नीचा निवडणुकीत झालेला पराभव, त्यासाठी आपल्याच पक्षातील नेत्यांनी विरोधकांना पुरवलेले बळ याचा बदला घेण्याच्या तयारीत धस होते. नेमका याचा फायदा पंकजांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने पंकजा यांनी जिल्हा परिषदेवर सत्तेचे तोरण बांधण्याची मोहीम आखली. धस समर्थक पाच सदस्यांनी भाजपला उघडपणे मतदान केले आणि जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलले. पंकजा यांच्या खेळीने राष्ट्रवादीत भूकंप झाला त्याचे धक्के अजूनही जिल्ह्यात जाणवतायेत. 
धनंजय मुंडेंना टोला 
जिल्हा परिषदेतील सत्ता मिळाल्याबद्दल परळीत नुकताच पंकजा मुंडे यांचा सत्कार झाला. यावेळी बोलतांना त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता "महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघालेल्यांना आपला पक्षही सांभाळता आला नाही' अशा भाषेत टोला लगावला. निवडणुकीतील पराभवाचे विष पचवू शकतो तोच खरा नेता होऊ शकतो. मला निवडणुकीपेक्षाही जनतेची अधिक चिंता असल्याचे सांगत त्यांनी नगरपालिकेतील पराभवामुळे आपण खचलो नव्हतो हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com