pankaj deshmukh take charge of satara sp | Sarkarnama

सातारा SP पंकज देशमुख: राजकीय दबावावर लगेच बोलणे उचित नाही!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्हा पोलिस दलाला घालून दिलेली शिस्त व गुन्हेगारांवर बसवलेला वचक अधिक प्रभावी होईल अशाच पद्धतीने कामकाजाची पद्धत असणार असल्याचे सांगून श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले. 

सातारा: खासगी सावकारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे राहिलेले वर्तुळही पूर्णपणे उद्धवस्त केले जाईल. राजकीय दबावावर आत्ता लगेच बोलणे उचित नाही. मात्र, वेळ आल्यावर कायद्यानुसारच निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट मत नुतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

आज दुपारी देशमुख यांचे साताऱ्यात आगमन झाले. शिवतेज विश्रामगृहावर थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर लगेचच त्यांनी अतिरिक्त अधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक मुख्यालय राजलक्ष्मी शिवणकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पदमाकर घनवट यांच्याकडून सातारा जिल्ह्याची माहिती घेतली. 

त्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालयात पदभार स्विकारला. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. श्री. देशमुख म्हणाले, पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात आदर्श काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक बसला. पोलिस दलातही शिस्त आली. त्यांचीच धोरणे पुढे चालू ठेवली जातील. किंबहून ती अधिक प्रभावीपणे राबविली जातील. 

खासगी सावकारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे राहिलेले वर्तुळही पूर्णपणे उद्धवस्त केले जाईल. मोक्कानुसार जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा योग्य पद्धतीने तपास करून प्रत्येक गुन्हा तडीस लावले जातील. गुन्हेगारांना शिक्षा होईल अशाच पद्धतीने या गुन्ह्याचा शेवट केला जाईल. 

राजकीय दबावावर आत्ता लगेच बोलणे उचीत होणार नाही. मात्र, वेळ आल्यावर कायद्यानुसारच निर्णय घेतले जातील असे एका प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधीत प्रश्‍नांचा अभ्यास करून ठोस धोरण ठरवले जाईल असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख