शंभराचा पेन आणि पाचशे रुपयांचा दंड ; आयुक्‍तांचा दुसऱ्या दिवशीही धमाका

शंभराचा पेन आणि पाचशे रुपयांचा दंड ; आयुक्‍तांचा दुसऱ्या दिवशीही धमाका

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सलग दुसऱ्या दिवशी प्लास्टीकचा वापर केल्यामुळे भाजपच्या नगरसेविकेला पाचशे रुपयांचा दंड केला. नव्या आयुक्तांना शंभर रुपयांचा पेन देऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी नगरसेविका आल्या होत्या. त्यांच्या स्वागताचा स्वीकार आयुक्तांनी केला, पण पेन प्लास्टीकच्या आवरणात असल्यामुळे त्यांना पाचशे रुपयांचा दंडही आकारला. 

महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. स्वागताला येताना कॅरिबॅगमध्ये पुष्पगुच्छ आणला म्हणून अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दंड लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता. 10) त्यांनी भाजप नगरसेविका मनिषा मुंडे यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. 

आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. सकाळी आयुक्त दालनात नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन पुष्पगुच्छ घेऊन आयुक्तांच्या दालनात आले. त्यांनी आणलेला पुष्पगुच्छ कॅरिबॅगमध्ये होता. हा प्रकार लक्षात येताच आयुक्तांनी महाजन यांना पाच हजार रुपयांचा दंड लावला. या प्रकारानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या नगरसेविका मनीषा मुंडे यांना देखील आयुक्तांच्या कारवाईला समोर जावे लागले. सकाळीच भाजप नगरसेवकांचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आयुक्तांना पेन भेट दिला. या गिफ्टला प्लॅस्टिक कागदाचे कव्हर लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना लगेच पाचशे रुपये दंडाची पावती देण्यात आली. 

आयुक्तांना मान राखण्यासाठी दंड भरला- मुंडे 
भाजप गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक शिवाजी दांडगे, गोकूळ मलके, ऍड. माधुरी अदवंत यांच्यासह इतरांचे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते. आयुक्तांचा सत्कार केल्यानंतर शिष्टमंडळ बाहेर येताच महापालिका कर्मचारी त्यांच्या मागून आले व पाचशे रुपयांची पावती घ्या, अशी विनंती केली. त्यावर काय घडले हे लवकर कोणाच्या लक्षात आले नाही. कर्मचाऱ्यांनी काय घडले याची माहिती दिल्यानंतर मनिषा मुंडे यांनी पाचशे रुपये भरून पावती घेतली. 

त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी गिफ्ट कव्हरला बंदी आहे का ? अशी विचारणा घन कचरा व्यवस्थापन विभागाकडे केली. त्यांना बंदी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आयुक्तांच्या कारवाईबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. गिफ्टला लावण्यात आलेल्या कागदावर बंदी नसल्याचे आपल्याला घन कचरा व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. मात्र आयुक्तांचा मान ठेवण्यासाठी पाचशे रुपये भरले. शेवटी हे पैसे महापालिकेच्या तिजोरीत गेले असल्याची मनीषा मुंडे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com