Panchayat elections in Marathwada | Sarkarnama

मराठवाड्यात सभापती निवडीसाठी "पंचायती' सुरु 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 मार्च 2017

2017 मध्ये हे चित्र पुर्णपणे बदलेल असून आघाडीला तब्बल 13 ठिकाणची सत्ता गमवावी लागल्याचे चित्र आहे. तर युतीला गेल्यावेळी पेक्षा यंदा 16 ठिकाणी अधिकची सत्ता मिळून त्यांच्या ताब्यात 44 पंचायत समित्या येणार आहेत. 

औरंगाबाद ः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. येत्या 14 मार्च रोजी मराठवाड्यातील बहुतांश पंचायत समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

2012 मध्ये सर्वाधिक 45 पंचायत समित्या या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तर 28 शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात होत्या. 2017 मध्ये हे चित्र पुर्णपणे बदलेल असून आघाडीला तब्बल 13 ठिकाणची सत्ता गमवावी लागल्याचे चित्र आहे. तर युतीला गेल्यावेळी पेक्षा यंदा 16 ठिकाणी अधिकची सत्ता मिळून त्यांच्या ताब्यात 44 पंचायत समित्या येणार आहेत. 

सगळेच पक्ष स्वबळावर लढल्यामुळे कुठे स्वंत्रपणे सत्ता मिळाली आहे तर काही ठिकाणी युती-आघाडी केली तरच सभापती बसवता येईल अशी परिस्थीती आहे. त्यामुळे सभापती पदासह सत्ता मिळवण्यासाठी मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी "पंचायती' सुरु झाल्याचे चित्र आहे. 

जिल्हा परिषदे प्रमाणेच पंचायत समिती निवडणुकीत देखील भाजपचा वरचष्मा राहिला. गेल्यावेळी भाजपची स्वबळावर 12 पंचायत समित्यांवर सत्ता होती. यंदा त्यात पाचने वाढ झाली आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेला देखील पुर्वीच्या 13 अधिक 4 अशा 17 पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळवता आले आहे.

स्वबळाचा विचार केल्यास 2012 मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या ताब्यात प्रत्येकी 21 पंचायत समित्या होत्या. तर आघाडी करून आणखी तीन ठिकाणी त्यांनी सत्ता मिळवली होती. याशिवाय अपक्ष आणि तीन पक्षांनी मिळून प्रत्येकी एका पंचायत समितीचा कारभार पाहिला होता. निवडणुकीत स्वबळ आजमावल्यानंतर आता युती-आघाडी करुनच अधिक पंचायत समित्या ताब्यात घेता येतील याचा अंदाज सर्वच पक्षांना आल्यामुळे सदस्यांची जुळवाजुळव आणि सभापती पदासाठीच्या मोर्चेंबांधणीला वेग आला आहे. 

आघाडी झाली, युतीचे भिजत घोंगडे 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीचा निर्णय झाला आहे. त्यानूसार 76 पैकी आघाडीला 32 पंचायत समित्या ताब्यात घेता येणार आहेत. शिवसेना-भाजपच्या युती बाबतचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. मुंबई येथील भाजपच्या कोअर कमिटीत जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेने सोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी शिवसेनेने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. युती झाल्यास 44 पंचायत समित्यांवर त्यांची सत्ता येऊ शकते. नांदेड, परभणी, उस्मानाबाद व बीड या चार जिल्ह्यांमध्ये युतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला चांगली लढत दिल्यामुळे या जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्या युतीच्या ताब्यात आल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख