Pancham Kalani elected Mayor of Ulhasnagar | Sarkarnama

राष्ट्रवादी ऐनवेळी तटस्थ :उल्हासनगरच्या  महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी 

सरकारनामा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या  पंचम कलानी  सुनबाई  आहेत. त्यांचे पती ओमी कलानी यांचा नगरसेवक पदाचा अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याने ऐनवेळी त्यांच्या पत्नी पंचम कलानी यांना नगरसेवक पदाची उमेदवारी  देण्यात आली होती .

उल्हासनगर : साई पक्षातील दोन नगरसेवक भाजपने फोडले आणि उल्हासनगरचे महापौरपद खेचून घेतले .   राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे ओमी कलानी यांनी अखेरच्या दोन दिवसात नाट्यमय घडामोडी घडवून आणल्याने  उल्हासनगरच्या  महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी यांची निवड झाली आहे . 

  पंचम  कलानी यांना  विरोध असलेल्या साई पक्षातील सात नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. मात्र ऐनवेळी त्यातील दोघांनी भाजपशी संधान साधले. दुसरीकडे, राष्ट्रवादीला तटस्थ राहण्याचे आदेश मिळाल्याने मतांची आकडेवारी आणि सत्तेचे गणित चुकल्याने साई-शिवसेनेच्या उमेदवार ज्योती बठीजा यांनी माघार घेतली. त्यामुळे 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी कलानी घराण्याच्या पदरात पंचम कलानी यांच्या रूपात महापौरपद पडले.

गतवर्षीच्या पालिका निवडणुकीत भाजप-साईपक्ष सत्तेत आल्यावर भाजपला महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच महापौरपदाचा मान मिळाला. भाजपच्या मीना आयलानी यांनी महापौरपद सव्वा वर्ष हाताळल्यावर राजीनामा दिला. करारानुसार पंचम कलानी यांना महापौरपद मिळणार असतानाच साई पक्षातील सात जणांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. 

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी-कॉंग्रेस-रिपाइं आठवले-भारिप-पीआरपी हे विरोधी पक्ष होते. त्यामुळे विजयी संख्याबळाचे गणित मांडत साई पक्षाच्या ज्योती बठीजा यांनी शिवसेनेच्या पाठिंब्याने उमेदवारी अर्ज सादर केला होता. शिवसेनेचे गटनेते रमेश चव्हाण व राष्ट्रवादीचे गटनेते भारत गंगोत्री यांनी बठीजा यांनाच मतदान करण्याचा व्हीप जारी केला. 

मात्र राष्ट्रवादीला गैरहजर किंवा तटस्थ राहण्याचे आदेश मिळाले. साई पक्षाचे शेरी लुंड, कंचन लुंड हे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने ओमी कलानी समूहात सहभागी झाले. कॉंग्रेस, भारिपच्या दोन नगरसेविकाही तटस्थ राहणार असल्याने ज्योती बठीजा आणि भाजपच्या डमी उमेदवार डिंपल ठाकूर यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर पीठासीन अधिकारी असलेले ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पंचम कलानी महापौरपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख