सिल्लोडच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे मी आव्हान मानतच नाही - प्रभाकर पालोदकर

सिल्लोडच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे मी आव्हान मानतच नाही - प्रभाकर पालोदकर


औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणूक ही सिल्लोड तालुक्‍यातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. माझ्यासमोर कुणाचे आव्हान आहे असे विचाराल, तर मुळात अब्दुल सत्तार यांचे आव्हान मी मानतच नाही. मतदारसंघात त्यांच्या विरोधातील रोष एवढा प्रचंड आहे, की ही निवडणूक आता पुढाऱ्यांच्या हातात न राहता, ती जनतेच्या हाती गेली आहे. संपुर्ण तालुक्‍यात परिवर्तनाची लाट निर्माण झाल्यामुळे यावेळी मतदार हेवेदावे-गटतट विसरून एकत्रिपणे लढा देतील आणि योग्य उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील असा विश्‍वास कॉंग्रेसचे नेते प्रभाकर पालोदकर यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला. 

कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. सत्तार यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांच्या पाठीशी सावली प्रमाणे उभे राहिलेले प्रभाकर पालोदकर हेच आता त्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेसकडून पालोदकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे देखील बोलले जाते. 

या पार्श्‍वभूमीवर प्रभाकर पालोदकर म्हणाले, आतापर्यंत तालुक्‍यातील निवडणूक पुढाऱ्यांच्या सांगण्यानूसार लढवली जायची, पण येणाऱ्या निवडणुकीत हा पायंडा मोडीत निघून जनताच सगळी सूत्र आपल्या हाती घेणार आहे. मध्यंतरीच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, पक्षांतराचा मोठा परिणाम या निवडणुकीत दिसून येईल. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण यामुळे भाजपमधील सत्तार विरोधाची धार आणखीच तेज झाली आहे. युतीधर्म पाळण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर दबाव आहे, पण ते मनाने त्यांच्या सोबत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषद सर्कलनिहाय सुरू असलेल्या दौऱ्यांमधून लोकांचा रोष स्पष्टपणे जाणवतो आहे. ही मोठी शक्ती निवडणुकीत माझ्या पाठीशी उभी राहील याचा मला ठाम विश्‍वास आहे. 

लढत थेटच.. 
निवडणुकीच्या तोंडावर मत विभाजनाचा मोठा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल. एक, नाही, दोन नाही तीन उमेदवार उभे केले जातील. पण हा खेळ आता जुना झाला आहे, लोकांना आम्ही हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मतदारांच्याही आता या गोष्टी लक्षात आल्या आहेत. त्यामुळे कितीही उमेदवार मैदानात असले तरी फाईट ही वन टु वनच होणार. लोकांचा मिळणारा प्रतिसाद ही येणाऱ्या निवडणुकीतील परिवर्तनाची नांदीच ठरेल असा दावा देखील प्रभाकर पालोदकर यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com