शिवसेनेनं लढायला शिकवलं, लढले म्हणून जिंकले ! 

एक गृहिणी ते पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद असा भारती भरत कामडी यांचा प्रवास राहिला आहे. शिवसेनेने लढायला शिकवलं म्हणूनच लढायला कधी घाबरले नाही. लढले आणि जिंकलेही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी.....!
 शिवसेनेनं लढायला शिकवलं, लढले म्हणून जिंकले ! 

राजकारणातही कोणाला कधी लॉटरी लागेल आणि कोण काय होईल हे सांगता येत नाही. हे सांगण्याचे कारणही असे की पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती भरत कामडी यांचाही राजकीय प्रवास असाच आहे. आदिवासी समाजातील एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेली ही मुलगी इतक्‍या मोठ्या पदावर दिसेल असे कधी वाटले नाही. 

ज्या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात कोणी लढायलाही इच्छुक नव्हते. असा मतदारसंघ निवडणे, आव्हान स्वीकारणे आणि निवडून येणे मुळीच सोपे नव्हते. पण, शिवसेनेच्या पाठिंब्यावर कामडी यांनी पाऊल मागे घेतले नाही. जयपराजयचा विचार न करता वाघिणीसारख्या मैदानात उतरल्या आणि विजयश्री खेचून आणला. 

त्यांचे पती साधारणपणे तीस वर्षापूर्वी वाडा तालुक्‍यातून पालघरमध्ये आले. पालघर पूर्वला असलेल्या घोलविरा (वेऊर) येथे एका छोट्या कंपनीत कामाला लागले. जेमतेम पगार. हातावरचं पोट कसतरी भरत होतं. आधार होता शिवसेनेचा.

कधीकधी शिवसेनेच्या शाखेतच झोपण्याची वेळही यायची. पण, जगण्याची लढाई ते लढत होते. त्याच दरम्यान भारती यांच्याशी (पूर्वीचे नाव भारती भेसकर) ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. 

पुढे नोकरी गेल्याने दोघंही छोटीमोठी कामे करीत. जम बसला. दिवस बदलले. ही दोघंही शिवसेनेचे कार्यकर्ते. पक्षाची निवडणूक असेल किंवा गणेशोत्सव, शिवजयंती, होळी असेल. त्यांचा सहभाग नाही असे कधी झालं नाही. 

ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर नवा पालघर जिल्हा उदयास आला. पालघरची वेगळी जिल्हा परिषद झाली. पालघर म्हणजे शिवसेनेचा बोलकिल्ला. तर विक्रमगड, जव्हारमध्ये भाजप आणि कम्युनिस्टांची ताकद. भारती मूळच्या पालघर. मा पक्षाने तिकीट दिले वाडा तालुक्‍यातील मांदा गटातून. पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाल्या. पाच वर्षानंतर हा मतदारसंघ (2020) ओबीसीसाठी राखीव झाला. त्यामुळे मतदारसंघच उरला नव्हता. फक्त एक मतदारसंघ होता. विक्रमगड तालुक्‍यातील तलवाडा. 

खरं या मतदारसंघात कोणी उभे राहायला धजावत नव्हते. कारण कम्युनिस्टांची मोठी ताकद. डिपॉजित जप्त होण्याची भीती. भारतीने मात्र येथे मी उभी राहते असे सांगितले आणि पक्षाने तिकीटही दिले. जानेवारी 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातूनही ती निवडून आली आणि दुसऱ्यांचा जिप सदस्य झाली. योगायोगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासींसाठी राखीव होते.

70 पैकी शिवसेना (18), कॉंग्रेस (1) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (13) बहुमत होते. 70 पैकी 57 जागा होत्या. पक्षाने तिला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद करण्याच निर्णय घेतला आणि गेल्या मंगळवारी ती अध्यक्ष बनली. एक साधी गृहिणी ते जिल्हा परिषद अध्यक्ष हा तिचा प्रवास राहिला आहे. 

तिचा हा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आदिवासी समाजातील एका गरीब कुटुंबातील मुलीने संधी मिळताच त्याचे सोने केले. शिवसेनेची महिला आघाडी असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य. तिने अफाट लोकसंग्रह निर्माण केला. भरत-भारती दोघांचाही जगण्यासाठी संघर्ष सुरू होता.

एक दिवस असा होता की साधं राहायला घरंही नव्हतं. पण, आज दोघांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून यश मिळविलं. राजकारणात संधी मिळालीच त्याशिवाय स्वत:च जांभूळपाड्यात हक्काचं घर जागाही. हे ही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहेच. 

जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर भारतीशी संपर्क साधला असता ती म्हणाली, की शिवसेनेने मला खूप काही दिलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र पाठक, जिल्हाप्रमुख सर्वश्री राजेश शहा, वसंत चव्हाण यांच्यासह सर्व नेत्या आणि कार्यकर्त्यांचा माझ्या यशात वाटा आहे. 

पती भरतने साथ दिली नसती तर मी घराचा उंबरठाही ओलांडला नसता. मी एक गोष्ट सांगेन की राजकारणही चांगलं क्षेत्र आहे. महिलांना येथे आपले कर्तृत्वसिद्ध करण्याची संधी आहे. घाबरण्याचे काहीच कारण नाही. लढायला कधी घाबरले नाही. कम्युनिस्टांच्या बालेकिल्यातील माझा विजय म्हणूनच मला खूप काही शिकवून गेला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com