Palghar news - MLA Amit Ghoda constructed bus stand sheds | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

आमदार अमित घोडा यांनी उभारलेल्या सव्वा कोटीच्या प्रवासी निवारा शेडवरील निधीचा अपव्यय? 

नीरज राऊत 
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पालघर : पालघरचे आमदार अमित घोडा यांनी आपल्या मतदारसंघामधून शहरी भागाला साजेसे असे स्टेनलेस स्टीलचे प्रवासी निवारे बनविण्यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा खर्च केला आहे. या स्टॅण्डमध्ये विसाव्यासाठी उभ्या राहणाऱ्या नागरिकांचे धड पावसापासून तसेच उन्हापासून संरक्षण होत नसल्याने या शहरी स्टाईलच्या स्टेनलेस स्टीलच्या थांब्यावर झालेला खर्च निरर्थक ठरण्याची शक्‍यता आहे. शिवाय प्रत्येक स्टॅण्डच्या उभारणीसाठी सुमारे पाच लाख 21 हजार रुपयांचा खर्च झाल्याने या निवाऱ्याची किंमत दुप्प्टीने फुगवली गेल्याचे आरोप होऊ लागले आहेत. 

पालघर : पालघरचे आमदार अमित घोडा यांनी आपल्या मतदारसंघामधून शहरी भागाला साजेसे असे स्टेनलेस स्टीलचे प्रवासी निवारे बनविण्यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा खर्च केला आहे. या स्टॅण्डमध्ये विसाव्यासाठी उभ्या राहणाऱ्या नागरिकांचे धड पावसापासून तसेच उन्हापासून संरक्षण होत नसल्याने या शहरी स्टाईलच्या स्टेनलेस स्टीलच्या थांब्यावर झालेला खर्च निरर्थक ठरण्याची शक्‍यता आहे. शिवाय प्रत्येक स्टॅण्डच्या उभारणीसाठी सुमारे पाच लाख 21 हजार रुपयांचा खर्च झाल्याने या निवाऱ्याची किंमत दुप्प्टीने फुगवली गेल्याचे आरोप होऊ लागले आहेत. 

आमदार अमित घोडा यांनी आपल्या आमदार निधीमधून काही तरी "हटके' करावे या उद्देशाने स्टेनलेस स्टीलचे प्रवासी निवारे उभारण्याची कल्पना अमलात आणली. शहरी डिझाईनचे तसेच एसएस-306 मटेरियलमध्ये 5.21 लक्ष रुपयांचा हा प्रत्येक स्टॅण्ड असून त्याचे डिझाईन व बनावट सुबक आहे. मुळात एस.टी.च्या वापरापेक्षा नागरिक सध्या रिक्षा-जीपचा वापर करीत असल्याने या खर्चीक स्टॅण्डचा एसटीच्या प्रवाशांना कितपत वापर होईल ही शंका व्यक्त केली जात आहे. त्यापुढे जाऊन या स्टॅण्डमध्ये प्रवाशाने थांबायचे ठरविले तर त्याच्या खुल्या पद्धतीच्या आखणीमुळे तसेच छप्पर अरुंद असल्याने प्रवाशांचे पावसापासून, उन्हापासून तसेच वाऱ्यापासून संरक्षण होणार नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

शहरी भागात असे निवारे लगतच्या इमारतीच्या सावलीत असल्याने तसेच उपलब्ध जागेची मर्यादा असल्याने या प्रकारच्या कमी रुंदीच्या स्टॅण्डचे डिझाईन प्रभावी ठरते. मात्र भौगोलिक परिस्थिती बदलली की कोणत्याही डिझाईनमध्ये बदल करायला हवे हे संकेत संबंधित अधिकारी व आमदारांना यांचा विसर पडल्याने एक शहरी-मॉडर्न "लूक व फिल' देणारा महागडा स्टॅण्डचे डिझाईन प्रस्तावित केला गेला. आमदार निधीचा "होऊन जाऊ दे खर्च' असा विचार केला जाऊन पालघर तालुक्‍यातील नऊ निवारा शेडसह मतदारसंघात 22 निवारा शेड बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. या निवारा स्टॅण्डचा पुढचा भाग मोकळा ठेवल्यास इतर बंदिस्त निवारा शेडमध्ये होणारे गैरप्रकार रोखले जातील या संकल्पनेने स्टॅण्डच्या पुढच्या भागातील "बॅरिकेड' डिझाईनमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. 

ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या 4-5 महिन्यात सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचे चटके बसतात. मग अशा गरमीच्या काळात हे स्टीलचे थांबे गरम झाल्यास ते कितपत उपयुक्त ठरतील याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. तारापूरमधील काही उद्योगांनी आपल्या सीएसआर फंडामधून तारापूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात स्टेनलेस स्टीलचे बस थांबे सुमारे तीन लाख रुपयांच्या खर्चात बसविले आहेत. सर्वसाधारणपणे याप्रकारचे स्टॅन्ड हे दीड-दोन लाख रुपयात तयार होऊ शकतात असे खासगी फॅब्रिकेटरचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत किमान दोन-अडीच लाख रुपयांचा अतिरिक्त खर्चीक ठरणारे 4.34 लाख रुपये किमतीचे महागडे डिझाईन अमलात आणून त्याचा "लाभ' कोणी कोणी वाटून घेतला हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार निधीतून बांधण्यात आलेले थांबे हे त्याचे मूळ उद्दिष्टे साध्य करण्यास फोल ठरत असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता याबाबत गांभीर्याने विचार करून या थांब्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी अतिरिक्त शीट टाकण्याचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले. 

या विषयी आमदार अमित घोडा यांच्याशी संपर्क साधला असता या स्टॅण्डच्या डिझाईनमध्ये त्रुटी असल्यास त्यामध्ये आवश्‍यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. या स्टॅण्डभोवती वृक्ष लागवड करून या स्टॅण्डची गरमीच्या मोसमात वापर होईल यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असे पुढे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख