राजेंद्र गावीत हेच चिंतामण वनगा यांचे राजकीय वारस : मुख्यमंत्री

राजेंद्र गावीत हेच चिंतामण वनगा यांचे राजकीय वारस : मुख्यमंत्री

पालघर : दिवंगत चिंतामण वनगा यांनी आपल्या जीवनात; तसेच भाजपा रुजविण्यासाठी आयुष्यभर परिश्रम व संघर्ष केला. हे पाहता अशाच परिस्थितीतून वाटचाल करणारे व वनगा यांचे गुण अंगीकृत असणारे राजेंद्र गावीत हेच दिवंगत खासदारांचे वारस ठरू शकतात, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कासा येथे सांगितले.

पालघरमध्ये कमळ फुलविणे ही चिंतामण वनगा यांनी खरी श्रद्धांजली ठरणार आहे. अन्यथा चिंतामण वनगा आपल्याला माफ करणार नाही, असे सांगून राजेंद्र गावीत यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

कासा येथे २० मे रोजी आयोजित प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेनेने कट कारस्थान रचून वनगा कुटुंबीयांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला, याबद्दल टीका करून श्रीनिवास वनगा यांच्या पराभवानंतर शिवसेनेतील दारे बंद होतील, असे खात्रीपूर्वक सांगितले. 

भाजपाचे वनगा कुटुंबीयांशी राजकीय नाते नसून कौटुंबिक जिव्हाळा असल्याचे नमूद केले. गावीत यांच्याशी विधानसभेकरिता आपण चर्चा करीत असल्याचा पुनरुच्चार करून दिवंगत वनगा यांचे कार्य पुढे ठेवत वंचितांच्या आवाजाला वाचा फोडतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले तरी कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू; जुने खावटी कर्ज माफ करून आदिवासी व कातकरी समाज बांधवांना नव्याने खावटी कर्ज उपलब्ध करून देऊ, स्थलांतर थांबविण्यासाठी उद्योग उभारू, पर्यटन विकास करू असे मुख्यमंत्री म्हणाले. 

दापचरी येथे नव्याने उभ्या राहणार्‍या एमआयडीसीमध्ये शंभर टक्के भूमिपुत्रांना रोजगार मिळेल असे सांगून पालघर जिल्ह्यात नव्याने शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व त्यांची पालघर जिल्ह्यात झालेली यशस्वी अंमलबजावणी याचा उल्लेख करीत पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट्य 2019 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

पेसा कायद्याची अंमलबजावणी, हागणदारी मुक्तीसाठी घेतलेले परिश्रम, जन धन योजना, उजाला योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, पूरक पोषण आहार, शिक्षणातील ‘स्वयंम’ योजना, आरोग्य विमा योजना यांची माहिती देऊन 60 कोटी रुपयांचे वारली हाट योजना राबवून येथील संस्कृती जगाच्या पाठीवर नेण्याचा विचार व्यक्त केले.

जिल्ह्यातील 35 हजार वनपट्ट्यांचे वितरण झाले असून 2019 पर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना वन पट्टे मिळतील तसेच त्याबरोबरीने शासनाच्या सर्व योजना, फळबाग लागवड, हॉर्टिकल्चर बागा तयार करण्याच्या योजना उपलब्ध होतील असे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल तसेच धरणामधून आजूबाजूच्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असे त्यांनी आश्‍वासन दिले. पालघर जिल्ह्यात बंधारे योजनेअंतर्गत लहान बंधार्‍यांची मालिका उभारून शाश्‍वत शेती करण्यासाठी सुविधा उपलब्ध करू असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com