Pak should think about the consequences - Swaraj | Sarkarnama

परिणामांचा विचार करा: संतप्त स्वराज यांचा इशारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

जाधव यांनी पाकिस्तानमध्ये कोणतेही गैरकृत्य केल्याचा एकही पुरावा नाही. अशा वेळी जाधव यांना फाशी देणे ही पूर्वनियोजित हत्याच आहे. जाधव यांना फाशी दिली गेल्यास भारत-पाक द्विपक्षीय संबंधांवर या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामाचा पाकिस्तानने विचार करावा- सुषमा स्वराज

नवी दिल्ली - भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय अंमलात आणल्यास त्याचे भारत-पाकिस्तान द्वीपक्षीय संबंधांवर होणारे परिणाम पाकिस्तानने लक्षात घ्यावेत, असा गर्भित इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (मंगळवार) दिला. जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा निर्धारही स्वराज यांनी यावेळी व्यक्त केला.

"जाधव यांनी पाकिस्तानमध्ये कोणतेही गैरकृत्य केल्याचा एकही पुरावा नाही. अशा वेळी जाधव यांना फाशी देणे ही पूर्वनियोजित हत्याच आहे. जाधव यांना फाशी दिली गेल्यास भारत-पाक द्विपक्षीय संबंधांवर या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामाचा पाकिस्तानने विचार करावा,'' असे स्वराज म्हणाल्या. राज्यसभेत बोलताना स्वराज यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. जाधव हे "भारताचे पुत्र' असल्याची भावना व्यक्त करत स्वराज यांनी त्यांच्या सुटकेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांत कोणतेही न्यून राहणार नाही, अशी ग्वाही दिली.

याआधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यासंदर्भात लोकसभेत निवेदन दिले होते. पाकिस्तानने जाधव प्रकरणी कायदा व न्यायासंदर्भातील सर्व संकेत पायदळी तुडविले असल्याचे स्पष्ट करत सिंह यांनी पाकच्या दाव्याप्रमाणे जाधव हे भारतीय हेर असतील; तर त्यांच्याकडे भारतीय पारपत्र कसे असेल, अशी विचारणा केली होती. जाधव यांना फाशी देण्यासंदर्भातील या निर्णयाचे द्विपक्षीय संबंधांवर दूरगामी पडसाद उमटण्याची गंभीर शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारताकडून पाकला देण्यात आलेला इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

पाकिस्तान शांतताप्रिय देश: शरीफ यांचा कांगावा
इस्लामाबाद - कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास हेरगिरीच्या संशयावरुन फाशी देण्याच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानला शेजारी देशांबरोबर चांगले संबंध रहावेत, अशी इच्छा असल्याचे म्हटले आहे. जाधव यांना फाशी देण्याच्या निर्णयानंतर भारताबरोबरील राजनैतिक तणाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना शरीफ यांनी पाकिस्तान हा शांतताप्रिय देशच असल्याचा दावा केला.

"पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. पाकिस्तानने शेजारी देशांबरोबर उत्तम संबंध राखले आहेत. आम्हाला संघर्ष नको असून सहकार्याची अपेक्षा आहे. पाकिस्तान मैत्रीचा हात पुढे करण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असे शरीफ म्हणाले. मात्र त्याचवेळी पाकिस्तानला असलेल्या कोणत्याही धोक्‍याचा समाचार घेण्यासाठी पाकचे सैन्य पूर्णत: सक्षम असल्याचा दावाही पाकिस्तानी पंतप्रधानांकडून करण्यात आला.

... आणि पाकिस्तानी हेराची भारत करतोय देखभाल
भोपाळ - कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास हेरगिरीच्या संशयावरुन फाशी देण्यासंदर्भात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घोषणेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर, भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी हेराचा भोपाळ येथील पोलिस दलाकडून केला जाणारा सांभाळ अधिक प्रकर्षाने उठून दिसणारा आहे. एकीकडे हेरगिरीच्या संशयावरुन पाकिस्तानकडून भारतीय नागरिकास थेट फाशी दिली जात आहे; तर दुसरीकडे साजीद मुनीर या पाकिस्तानी हेरास पाकिस्तानने स्वीकारावयासही नकार दिल्यानंतर त्याचा भोपाळ पोलिसदलाकडून सांभाळ केला जात आहे.

भारतीय लष्कराच्या भोपाळमधील तळावर आयएसआय या पाकच्या कुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेसाठी 'नजर' ठेवल्याप्रकरणी मुनीर याला 12 वर्षांचा कारावास झाला होता. हेरगिरीच्या आरोपांतर्गत दोषी आढळल्यानंतर मुनीर याला 12 वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनाविण्यात आली होती. शिक्षा भोगलेल्या मुनीर याला स्वीकारावयास पाकिस्तानकडून स्पष्ट नकार देण्यात आला. यामुळे येथील पोलिस दलाकडूनच गेल्या 10 महिन्यांपासून त्याची काळजी घेतली जात आहे. भोपाळमधील कोह-इ-फिझा या पोलिस ठाण्यामध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. येथील जिल्हा विशेष विभागाकडून मुनीर याच्या देखभालीचा पूर्ण खर्च करण्यात येत आहे. मुनीर याला पाकिस्तानकडे हस्तांतरित करण्यात यावे, अशा आशयाची विनंती भोपाळ पोलिस दलाकडून पोलिस मुख्यालयाकडे करण्यात आली आहे. मात्र अद्यापी याप्रकरणी पाकिस्तानकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. परंतु तोपर्यंत मुनीर याची भारताकडून काळजी घेण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख