ब्रह्मगव्हाण योजना आणि पैठण एमआयडीसीच्या विकासाला प्राधान्य- दत्ता गोर्डे

पैठण तालुक्‍यात अनेक महत्वाचे विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. मतदारांनी संधी दिली तर ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना, पैठण एमआयडीसीचा विकास आणि तालुका टॅंकर मुक्त करण्याला आपले प्राधान्य असेल असे सांगतानाच सरकारी रुग्णालयाचा गंभीर प्रश्न मार्गी देखील मार्गी लावू, असे आश्‍वासन पैठण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी दिले.
Datta Gorde
Datta Gorde

पैठण : पैठण तालुक्‍यात अनेक महत्वाचे विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. मतदारांनी संधी दिली तर ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना, पैठण एमआयडीसीचा विकास आणि तालुका टॅंकर मुक्त करण्याला आपले प्राधान्य असेल असे सांगतानाच सरकारी रुग्णालयाचा गंभीर प्रश्न मार्गी देखील मार्गी लावू, असे आश्‍वासन पैठण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी दिले.

पैठण विधानसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षात सत्ताधाऱ्यांकडून कसलाच विकास झाला नाही असा आरोप करत मतदारांनी आपल्याला संधी दिली तर तालुक्‍याचा विकास करु असा दावा गोर्डे यांनी आपल्या प्रचारा दरम्यान केला आहे. गोर्डे म्हणाले, ''वीस वर्षात नव्हे तर गेल्या 40 वर्षात पैठण तालुक्‍यातील विकास प्रश्नाची माती झाली. वास्तविक पाहता जायकवाडी धरण असतांना येथे विकासाची वाणवा आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान विकासापासुन वंचित आहे, तर जगप्रसिद्ध पैठणी साडीला देखील हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. जायकवाडी धरणातुन गोदापात्रातील आपेगाव व हिरडपुरी या बंधाऱ्यात यंदा वेळेवर पाणी सोडण्यात आले नाही, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे तब्बल 10 कोटी रुपयाचे नुकसान झाले असुन पैठण तालुक्‍यातील 121 शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती व कर्जामुळे आत्महत्या केल्या आहेत.'' पैठण येथील सरकारी रुग्णालय हे जनतेसाठीचे रुग्णालय नसुन डॉक्‍टरांचे प्रशिक्षण केंद्र बनले आहे, असा आरोप करत हा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असे गोर्डे यांनी सांगितले.

''पैठण एमआयडीसीची स्थापना सरकारने केल्यानंतर एक ही उद्योग इथे नव्याने सुरु झाला नाही. उलट आहे त्या कारखानदारांनी कारखाने बंद केले. नवीन कारखाने या भागात उभारण्यासाठी राजकीय नेत्यांनी सत्त्तेचा वापर केला नाही, त्यासाठी पाठपुरावा केला नाही, परिणामी राज्य सरकारने ही दुर्लक्ष केले. एमआयडीसी व डिएमआयसी या कारखानदारी उद्योगात नौकऱ्या न मिळाल्याने आज बेरोजगांराचा तालुका अशी पैठणची ओळख बनली आहे,'' असा आरोप दत्ता गोर्डे यांनी केला.

भूमिपुत्रांच्या हाताला काम नाही
''स्थानिक भुमिपुत्रांनी तांत्रिक शिक्षण, उच्च शिक्षण घेवुन ही कारखानदारी अभावी या तालुक्‍यातील तरुणांचा हाताला काम नाही, पोटापाण्यासाठी त्यांना गाव सोडून जावे लागत आहे. पैठण-औरंगाबाद हा चौपदरीकरणाचा मार्ग वीस वर्षापासुन कागदावरच फिरत आहे. एक ही सत्त्तेतील नेता यासाठी पुढे येत नाही. यामुळे पैठण हे धार्मिक व ऐतिहासिक शहर असुन देखील इकडे पर्यटक फिरकत नाही. पैठणीची बाजारपेठ कोलमडली आहे.'' असेही ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, ''जायकवाडी धरणाच्या पाण्याचा लाभ तालुक्‍यातील प्रत्येक गावाला झाला पाहिजे, आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात कायमस्वरूपी पाणीसाठा राहिला पाहिजे, धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न ही आजपर्यंत शासनदरबारी मार्गी लागलेले नाहीत. तालुक्‍यातील नऊ जिल्हा परिषदेच्या सर्कल मधील रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी या भागात रस्त्याचे जाळे निर्माण केले जाणार आहे. शेतमाल व ऊस वाहतुकीसाठी शिवार रस्ते आवश्‍यक आहेत, शिक्षणाच्या सुविधांपासून देखील तालुका खूपच मागे आहे. यासाठी सीबीएससी पॅटर्न शाळा, औद्योगिक क्षेत्र लक्षात घेवुन पैठण व बिडकीन येथे इंजिनिअरिंग कॉलेज, आयटीआय संस्थेत विद्यार्थी प्रवेश संख्येत वाढ तसेच महाविद्यालयाची संख्या वाढवुन विज्ञान शाखेत वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहील. जिल्हा परिषद व खाजगी शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची उभारणी करण्यात येईल. भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने नवीन शासकीय विश्रामगृह, माल विक्रीसाठी स्वतंत्र मार्केट, पैठण बसस्थानक नवीन बांधकाम व बिडकीन येथे नवीन बसस्थानकाची आवश्‍यकता आहे.''

''पैठण येथे नाथमंदिर परिसरात भाविकांना सुविधा, अद्यावत भक्त निवास, दशक्रिया विधी घाटावर सोई सुविधा, सर्व धर्मियांच्या प्रार्थना स्थळ, मंदिराचा विकास व धुपखेडा येथील साई मंदिराचा पैठण - आपेगाव विकास प्राधिकरणात समावेश आदी प्रश्न सोडविण्याचा आपला मानस आहे," असेही दत्ता गोर्डे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com