राणा जगजितसिंह यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाला पद्मसिंहांचा पाठिंबा

राणा जगजितसिंह यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाला पद्मसिंहांचा पाठिंबा

पुणे : आपल्या जिल्ह्यातील नागरिकांचा आपल्यावर सर्वात पहिला हक्क आहे, असे सांगत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डाॅ. पद्मसिंह पाटील यांनी आपले पुत्र राणा जगजितसिंह यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

राणा जगजितसिंह हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्यासोबत बरीच वर्षे राहिलेले पाटील घराणे राष्ट्रवादी सोडणार की नाही, यावर गेली अनेक दिवस बोलले जात होते. त्यातही पद्मसिंह यांचा राणांच्या निर्णयाला पाठिंबा राहणार की नाही, याचीही शंका होती. मात्र ही शंका डाॅक्टर पाटील यांनी दूर करत आपले पुत्र जो काही निर्णय घेतील, त्याला पाठिंबा दिला आहे.

तशा आशयाची फेसबुक पोस्ट पद्मसिंह पाटील यांनी लिहिली आहे. राणा यांनीही आपण 31 आॅगस्ट रोजी जनतेशी संवाद साधणार आहेत, असे जाहीर केले आहे. त्यामुळे हा निर्णय़ नक्कीच राष्ट्रवादी सोडण्याचा आणि भाजप प्रवेशाचा असू शकतो, अशी अटकळ आहे. 

या पोस्टमध्ये डाॅक्टर म्हणतात, ``तुम्ही (जगजितसिंह) मागील 15 वर्ष एक लोकप्रतिनिधी म्हणून जे प्रामाणिक कार्य करत आहात, लोकहितासाठी जे प्रयत्न करत आहात ते पाहून अत्यंत समाधान वाटते आहे. एका वडिलांचा याहून मोठा आनंद काय असू शकतो? आपण स्वीकारलेले लोकसेवेचे काम,आपण घेतलेला वसा आपला मुलगा जीवितकार्य म्हणून, संकल्प म्हणून पुढे चालवत आहे. नुसता चालवतच नाही तर यशस्वीपणाने केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.``

``लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाचा उतराई होण्यासाठी सतत कार्य करत राहणे हे तुमचे आद्य आणि अंतिम कर्तव्य आहे. आपल्याला ज्यांनी परिवारातील सदस्याप्रमाणे प्रेम दिले, जे लोकहिताच्या कार्यात सहभागी झाले, ज्यांनी आपल्याला घडविले, आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, आपल्याला सांभाळले, संघर्षात साथ दिली, प्रत्येक हाकेला प्रतिसाद दिला, सुखदु:खात आपल्याला सहभागी करून घेतले,अश्या आपल्या जिल्ह्यातील नागरिकांचा आपल्यावर सर्वात पहिला हक्क आहे. त्यांच्या हितासाठी जो कोणता निर्णय आवश्यक वाटत असेल तो घेतलाच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

``तुमच्यातील प्रामाणिकपणा हीच सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्यातील याच गुणाचा मला सर्वाधिक अभिमान आहे, असेही डाॅक्टरांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com