माजी खासदाराच्या ड्रायव्हर आणि पीएलाही पोलिसांची मारहाण : कर्फ्यू तोडल्याचे कारण

जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता कारवाई केल्याचा आरोप माजी खासदार दिलीप गांधी यांनी केला.
ex mp dilip gandi vehicle caught in curfew
ex mp dilip gandi vehicle caught in curfew

नगर : नगर शहरात आज बाहेर फिरणाऱ्या लोकांवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वतः रस्त्यावर येवून कारवाई केली. माजी खासदार दिलीप गांधी यांची गाडीही त्यातून सोडली नाही. या गाडीच्या नेमप्लेटवर `माजी खासदार` असे लिहिले असतानाही पोलिसांनी हे वाहन अडवून चालक व गांधी यांचे स्वीय सहाय्यक यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला.

याबाबत भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त करून ही बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगितली असल्याचे सांगितले.

आज सकाळी जिल्हाधिकारी स्वतः शहरातील प्रमुख भागात फिरत होते. दिसेल त्यांच्यावर कारवाई केली जात होती. ओळखपत्र दाखविले तरीही त्याची कसून चाैकशी केली जात होती. वाहने अडवून त्यांची हवा सोडली जात होती. इतर गाड्यांप्रमाणे माजी खासदार दिलीप गांधी यांचीही गाडी अडविली. चालकाने माजी खासदार दिलीप गांधी यांची गाडी असल्याचे सांगितले. तसेच आम्ही अन्नदान करून फवारणीसाठी जंतुनाशके आणण्यासाठी जात आहोत, असे सांगितले.  गाडीच्या नेमप्लेटवरही `माजी खासदार` असे लिहिलेले असताना चालकाला व गाडीत असलेल्या असलेल्या गांधी यांच्या  सहाय्यकाला पोलिसांनी खाली उतरून त्यांना मारहाण केली.  

ते जंतुनाशके आणण्यासाठी जात होते : गांधी
या घटनेबाबत माजी खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लोकांना मदत करण्याचे काम भाजपचे नेते करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरातील काही भागातील गरजू नागरिकांना अन्न पुरविण्याचे काम आम्ही करीत आहोत. तसेच आवश्यक तेथे जंतुनाशकांची फवारणी करीत आहोत. आज सकाळी अन्नदान करून सोडियम क्लोराईड आणण्यासाठी माझे स्विय सहाय्यक चालले असताना पोलिसांनी ही गाडी अडवून गाडीचे चालक व स्विय सहायकास मारहाण केली. तसेच सोशल मीडियावर फोटो टाकून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही पोलिसांची व जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका योग्य नाही. याबाबत आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे.

ते नागरिक बाहेर कसे?
शहरात लाॅकडाऊन असतानाही अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. काही दुकानेही उघडी असल्याचे दिसून येतात. काही केमिकलचे दुकान उघडे असल्याने फवारणीसाठी सोडियम क्लोराईड आणण्यासाठी आमची गाडी गेली. सर्व भागात 144 कलम लागू असताना अनेक ठिकाणी लोक राजरोस फिरताना दिसत आहेत. नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष का करते. मी प्रशासनाला मदतच करीत असताना गाडीचालक व स्विय सहायकाला मारहाण करणे, हे चुकीचे आहे, असे सांगून गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com