p n patil politics | Sarkarnama

पी. एन. पाटील यांच्यावर कां ओढवली नामुष्की ? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

जिल्ह्याच्या राजकारणात पी. एन. यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत अशी कबुली कालच महादेवराव महाडीक यांनी दिली. हेही खरेच आहे. पी. एन. सोबत नसतील तर "गोकूळ' त्यांच्या ताब्यात रहात नाही हेही सत्य आहे. या दोघांची मैत्री जिवलग आहे. प्रत्येक निवडणुकीत कोण विरोधात आहे हे न पाहता पी. एन. यांनी मात्र
नेहमी श्री. महाडीक यांची साथ धरली. पण त्याच महाडीक यांनी त्यांच्या घरात पद जात असताना विरोधात मोट बांधून त्यांना धक्का दिला. पी. एन. यांचा मुलगा उमेदवार असेल तर महाडीक रिंगणातही उतरणार नाहीत अशी राजकीय क्षेत्रात चर्चा होती, पण त्यालाही श्री. महाडीक यांनी छेद दिला. 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात मग ते "गोकूळ' असो की जिल्हा बॅंक, विधानसभा यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ज्यांना ज्यांना मदत केली, त्यांनीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीत त्यांचा विश्‍वासघात केला. ऐनवेळी या सर्वांना पी. एन. यांच्या उपकाराचा विसर पडल्याने त्यांना या निवडणुकीत
मुलाचे नांव मागे घेण्याचे नामुष्की आली. 

जिल्ह्याच्या राजकारणात पक्षनिष्ठ, धोका न देणारा किंवा विश्‍वासघात न करणारा नेता यांची यादी ज्यावेळी केली जाईल त्यात पी. एन. यांचे नांव आघाडीवर असेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपला कार्यकर्ता पडला तरी चालेल पण कोण सांगतय म्हणून कधी उमेदवार त्यांनी बदलला नाही. इतरांसाठी कोणतीही
तडजोड न करणाऱ्या पी. एन. यांनी मुलांसाठी जरूर हट्ट धरला असेल पण अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत ज्यांनी रहायला पाहिजे होते, त्यांनीच त्यांना टांग मारली. 

शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करताना पी. एन. यांनी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे यांना अंगावर घेतले. एवढेच नव्हे तर श्री. घाटगे यांच्या प्रत्येक राजकीय वाटचालीत ते त्यांच्या मागे राहिले. "गोकूळ' मध्ये त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची वेळ असो किंवा मुलाला विरोधी पॅनेलमधून विजयी करण्यासाठीचे प्रयत्न या सर्व पातळीवर पी. एन. श्री. घाटगे यांच्यासोबत राहिले. मात्र जिल्हा परिषदेत श्री. घाटगे यांनी मात्र त्यांना "हात' दाखवला. 

जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तर श्री. आवाडे हे आपले कार्यकर्ते विलास गाताडे यांच्यासाठी आग्रही होते. नुसते आग्रही नव्हते तर प्रसंगी विरोधात जाऊ अशी धमकीही त्यांनी दिली होती. पण यालाही न जुमानता त्यांनी अप्पी पाटील यांना उपाध्यक्ष केले. पण हेच अप्पी पाटील ऐनवेळी त्यांची साथ सोडून निघून गेले. 

लोकसभेच्या निवडणुकीत पी. एन. हे राष्ट्रवादीच्या मागे ठाम राहिल्याने खासदार धनंजय महाडीक यांना करवीर व राधानगरीतून विक्रमी मतदान मिळाले. पण श्री. महाडीक यांनी मात्र विरोधकांना एकत्र करून त्यांच्या वाहनाचे सारथ्य करण्यात धन्यता मानली. माजी आमदार बजरंग देसाई यांच्यासाठीही पी. एन. यांनी अनेकदा मदत केली. मुलाला "गोकूळ' मध्ये संचालक, स्वतः श्री. देसाई यांना विधानसभेचे तिकीट मिळवून देणे यावर आघाडीवर राहिलेल्या पी. एन. यांची साथ श्री. देसाई यांनी सोडली व निवडीला सुनेलाच त्यांनी गैरहजर ठेवले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख