Owaisi - Ambedkar will finalize alliance on 2 october : Imtiaz Zaleel | Sarkarnama

आघाडीचा फैसला ओवेसी व आंबेडकरांच्या दोन तारखेच्या सभेतच :  इम्तियाज जलील 

सरकारनामा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

प्रकाश आंबेडकरांच्या  विधानानंतर एमआयएम कॉंग्रेस सोबत जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

औरंगाबादः जातीयवादी शिवसेना, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात एकत्रित येऊन संघटितपणे या शक्तींचा मुकाबला करण्याची भूमिका आम्ही वंचित बहुजन आघाडी (भारिप) चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मांडली होती.

या संदर्भातली प्राथमिक बोलणी झालेली आहे. आघाडीचा अंतिम निर्णय औरंगाबादेत 2 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या खासदार असदुद्दीन ओवेसी व प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त सभेतच होईल असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. 

समाजातील माळी, कोळी, आदिवासी, धनगर, वडार, मुस्लिम, ओबीसी, लिंगायत यांच्यासह अठरा पगड जातींना सोबत घेऊन भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची मोट बांधली. या आघाडी सोबत जाण्याचा प्रस्ताव एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून दिला होता. 

एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. या नव्या समीकरणांची दखल विविध राजकीय पक्षांनी घेतली. खासदार असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी उचललेले हे पाऊल महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार असे देखील बोलले जाऊ लागले. 

दलित आणि मुस्लिम समाजाचा आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ वोट बॅंक म्हणून वापर केल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. परंतु यापुढे केवळ रबर स्टॅम्प किंवा वोट बॅंक म्हणून आपल्याकडे पाहिले जाऊ नये यासाठी एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडी एकत्र आल्याचे सांगितले जाते. 

एमआयएमने सत्ताधारी शिवसेना-भाजप यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोध दर्शवत बहुजन वंचित आघाडीशी सोबत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आज (ता. 20) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेससाठी आमचे दरवाजे खुले असल्याचे जाहीर केले. 

प्रकाश आंबेडकरांच्या या विधानानंतर एमआयएम कॉंग्रेस सोबत जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमीवर एमआयएमचे आमदार व महाराष्ट्रातील नेते इम्तियाज जलील यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडी (भारिप)ने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 

असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडी संदर्भात प्राथमिक बोलणी झाली आहे. औरंगाबादेत संयुक्त जाहीर सभेतून या आघाडी संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज कॉंग्रेससाठी आमचे दरवाजे खुले असल्याचे विधान केले असले तरी त्याचा एमआयएम -बहुजन वंचित आघाडीवर काय परिणाम होणार याचे उत्तर आमचे नेते असदुद्दीन ओवेसी हेच देतील. 2 ऑक्‍टोबर रोजी औरंगाबादेत होणाऱ्या सभेतच या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख