इम्तियाज जलील यांचे विधान ही पक्षाची अधिकृत भूमिका - असदुद्दीन ओवेसी

इम्तियाज जलील यांचे विधान ही पक्षाची अधिकृत भूमिका - असदुद्दीन ओवेसी

औरंगाबाद : " जो स्टेटमेंट इम्तियाज जलील सहाब,ने किया है जो हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष है, वो ही पार्टीका ऑफिशियल स्टॅंड है, वो इम्तियाज जलीलका इंडिव्हयुजनल स्टॅंड नही है ' असे स्पष्ट करत एमआयएमचे सर्वेसवा असदुद्दीन आवेसी यांनी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी तुटल्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

ओवेसी हे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते जोपर्यंत स्वःत जाहीर करत नाही तापेर्यंत आमची एमआयएमशी युती कायम आहे असे सांगत प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांचे आघाडीबद्दलचे विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाकारले होते. यावरून राज्यात गोंधळाचे वातावरण असतांना एमआयएमचे अध्यक्ष असदद्दुीन ओवेसी यांनी हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत या बाबतचा मोठा खुलासा केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात युती, आघाड्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजपला वंचितने 41 लाख मते महाराष्ट्रात मिळवून मोठा धक्का दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र निवडणूका लढवतील असे बोलले जात होते. एमआयएमने दिलेला 74 जागांचा प्रस्ताव फेटाळत वंचितचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना केवळ 8 जागा देण्याची तयारी दर्शवली. शिवाय आपली चर्चा थेट ओवेसी यांच्याशी सुरू आहे, आपण इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करणार नाही असे सांगत प्रकाश आंबडेकरांनी खळबळ उडवून दिली होती. एकत्रित निवडणूक लढवण्या संदर्भात आंबेडकरांकडून निर्णय घेण्यासाठी केली जाणारी दिरंगाई, केवळ आठ जागा देण्याची तयारी दर्शवत दिलेली अपमानास्पद वागणूक याचा परिणाम वंचित बहुजन आघाडीसोबत फारकत होण्यात झाला. 

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अधिकृतपणे पत्र काढून आपण स्वंतत्रपणे मुलाखती घेणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. त्यानंतर वंचित आणि एमआयएममधील संबंध अधिकच बिघडले. दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप केले जात होते. प्रकाश आंबेडकर यांनी एका वेबपोर्टलशी बोलताना इम्तियाज जलील यांना उद्देशून गंगू तेली, चपराशी असा अपमानास्पद उल्लेख केला होता. शिवया मी एका पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे मी त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलणार, माझे त्यांच्याशी बोलणे सुरू आहे याचा पुनरूच्चार देखील प्रकाश आंबेडकर यांनी या मुलाखतीत केला होता. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधून अखेर या वादावर पडदा टाकला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com