out of 12-mlas-8 remain-absent-cm-fadnvis's-meet on drought | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीकडे औरंगाबादच्या १२ पैकी ८ आमदारांची पाठ !

सरकारनामा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

हे आमदार होते गैरहजर.. 

कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे, शिवसेनेचे संदीपान भुमरे, संजय सिरसाट, हर्षवर्धन जाधव हे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आढावा बैठकीकडे फिरकलेच नाहीत. 

औरंगाबादः राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी  मागणी शिवसेनेसह, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षाने केली आहे. अगदी त्यासाठी आंदोलने देखील सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची तीव्रता थेट मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची चालून आलेली संधी मात्र जिल्ह्यातील अन्य आमदारांनी गमावली.

भाजपचे अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आणि एमआयएमचे इम्तियाज जलील वगळता जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीकडे पाठ फिरवली. 

येत्या 31 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात टंचाई परिस्थिती जाहीर करण्यात येणार असून त्यापुर्वी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानूसार आज (ता.10) औरंगाबाद जिल्ह्याची आढावा बैठक त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीला आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, इम्तियाज जलील यांनीच हजेरी लावली. शहर व जिल्ह्यातील एकूण नऊ आणि विधान परिषदेतील तीन अशा बारा आमदारांपैकी फक्त चौघेच बैठकीत सहभागी झाले होते. 

 एल्गार करणारे गायब 

राज्यात विशेषता मराठवाड्यात सध्या दुष्काळाची परिस्थीती निर्माण झाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने देखील दुष्काळ जाहीर करण्याची मागणी रेटली आहे. कॉंग्रेसने तर जिल्ह्यात भाजप-सेना युती सरकारच्या विरोधात एल्गार यात्रा काढत रान पेटवले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक आणि संविधान बचाव देश बचाव मेळाव्यात देखील अजित पवारांनी दुष्काळ जाहीर करायला सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिजे अशा जळजळीत सवाल केला होता. नेत्याकडून दुष्काळ जाहीर करा अशी वारंवार मागणी केली जात असतांना या संदर्भातल्या बैठकीलाच पक्षाच्या आमदारांनी दांडी मारल्यामुळे विरोधक किती गंभीर आहेत याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. 

खासदार खैरेंकडून स्वागत.. 

जिल्हा आढावा बैठकीकडे जिल्ह्यातील आमदारांनी पाठ फिरवली असली तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच खैरे यांनी त्यांच्या भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि ते निघून गेले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख